रत्नागिरी:- शहरातील जोशी पाळंद परिसरातून बेपत्ता झालेल्या अॅड. तेजस कोरगावकर यांना त्यांच्या मित्रांनी शनिवारी रात्री कोल्हापूर येथून सुखरुप रत्नागिरीत आणले आहे. कौटुंबिक कारणातून ते कोल्हापूरला गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
तेजस कोरगावकर २ जानेवारी रोजी घरात चिपळूणला जातो असे सांगत आपल्या कारने निघून गेले होते. त्यांच्या नोतवाईकांनी त्यांचा आजुबाजुला शोध घेउन तसेच इतर नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती. याप्रकरणी शहर पोलिस तपास करत असताना त्यांना कोल्हापूर येथील एटीएम मधून कोरगावकर यांच्या कार्डद्वारे पैसे काढण्यात आल्याची माहिती मिळाली होती. परंतु त्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अडचण निर्माण होत होती.
आपला मित्र बेपत्ता झाल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी अॅड. विवेक दुबे, अॅड. सचिन थरवळ, अॅड. मिलिंद जाधव यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी हे तिघेही कोल्हापूरला रवाना झाले.परंतू कोरगावकर यांचा मोबाईल बंद असल्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे आव्हान या तिघांसमोर होते. कोल्हापूरमध्ये शोध घेताना ताराबाई चौक येथील एका लॉज बाहेर तेजस कोरगावकर यांची कार दिसली. तिघांनीही लॉजमध्ये जाउन चौकशी केल्यावर त्याठिकाणी तेजस कोरगावकर होता. शनिवारी रात्री हे सर्वजण पुन्हा रत्नागिरीत परतले असून शहर पोलिसांकडूनही सहकार्य मिळाल्यामुळे तेजसला शोधण्यात यश मिळाल्याचे अॅड. विवेक दुबे यांनी सांगितले.









