रत्नागिरी:- रत्नागिरीतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुली थेट नागालँडमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन अल्पवयीन मुलींसोबत एका मुलाला देखील शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काही दिवसापूर्वी रत्नागिरी शहरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसानी या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणाचा एक धागा लागला. त्यादृष्टीने शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची एक टीम रेल्वे प्रवास करत नागालँडकडे रवाना झाली. तेथे स्थानिक पोलीसांच्या मदतीने तपासाला गती देण्यात आली. पोलिसांनी काही वेळातच त्या दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत नागालँड येथील अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून धक्कादायक खुलासे होत आहेत.
मुलाच्या बाबतीत वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. हा मुलगा मोबाईलमधला मास्टर माईंड आहे. आपल्या सोबत असलेल्या मुली कोणाला कळू नयेत म्हणून त्याने लोकेशन, आपल्या फोन मेमरीतील पुरावे नष्ट करण्यासाठी संपूर्ण मेमरी डिलीट केली. त्याचबरोबर वापरत असलेले सीम तोडून फेकून दिले. त्यानंतर नवीन सीम तो मोबाईलमध्ये वापरत होता. नागालँडवरून त्या तिघांना घेवून पोलीस रत्नागिरीत दाखल झाले आहेत. आता त्यांच्या तपासात आणखी कोणती माहिती पुढे येते हे पहावे लागेल. या मुली नागालँडला कशा पोहोचल्या? काय कारण असावं? या प्रश्नांची उत्तरे तपासा दरम्यान पुढे येणार आहेत.