रत्नागिरीतून थेट अमेरीकेतील गणेशाची प्रतिष्ठापना

रत्नागिरी:- कोरोना महामारीचे आज गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापणेवरही काहीसे सावट असताना अनेकांनी नवनवीन शक्कल काढत यावर मात केली. काहींनी पीपीई किट घालत पूजा सांगितली मात्र रत्नागिरीतील अभय मुळ्ये गुरुजीनी अमेरिकेतील डलास येथील गणेशाची ऑनलाईन प्राणप्रतिष्ठापना केली. 

कोरोनाच्या महामारीचे संकट कमी झालेले नाही. गेली पाच महिने नागरिक या संकटाचा सामना करीत आहेत. त्याचा सर्व क्षेत्रावर विपरित परिणाम झाला असून सण, उत्सवदेखील त्यातून सुटलेले नाहीत. कोकणासह राज्यात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने व दिमाखात साजरा केला जातो. संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी हा उत्सव रद्द केला किंवा त्याचे विस्तारित स्वरूप कमी केले. यावर्षी अनेक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना ऑनलाईन करण्यात आली. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी वेळेत भटजी मिळणे गरजेचे असते. कोरोनाचे सावट असल्याने संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष येऊन पूजाअर्चा करीत प्राणप्रतिष्ठापना करण्यापेक्षा ऑनलाइन गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली. रत्नागिरीतील अभय मुळये गुरुजी यांनी रत्नागिरी, मुंबई, पुणे येथे गुगल मीट अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पूजा केली. व्हॉट्स अ‍ॅप कॉलच्या माध्यमातूनही अनेकांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. काही भटजींनी तर पीपीई कीट घालून पूजा केली तर काहींनी प्रत्यक्ष जाऊन मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करून पूजा केली. संसर्ग टाळण्यासाठी आधुनिक तंत्राचा चांगला वापर धार्मिक कार्यात केल्याचे स्पष्ट  होते. एवढेच नाही, तर श्री. मुळ्ये आज रात्री आठ वाजता अमेरिकेतील डलास येथे गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे.

गुगल मीटच्या माध्यमातून अनेकांना यामध्ये घेता येते. मात्र पूजेचे पावित्र्य आणि व्यक्तीगत लक्ष देत पूजा करता यावी, यासाठी एकावेळी चौघांना ऑनलाईन घेऊन प्रतिष्ठापना करतो. त्यासाठी मी घरी ऑफ्टिकल फायबरपासून इन्व्हटरची व्यवस्था केली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला तरी पुजेमध्ये व्यत्यय येत नाही.
अभय मुळ्ये, गुरुजी, रत्नागिरी