रत्नागिरी:- शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. नवीन नळपाणी योजनेचा वारंवार बोजवारा उडत आहे. तोडण्यात आलेल्या झाडांचा कचरा वेळेवर उचलला जात नाही. अनेक ठिकाणी गटारी उघड्या पडल्या असून त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या सारख्या अनेक समस्यांकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी नगर परिषदेवर धडक दिली. नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकांना निवेदन देऊन पंधरा दिवसात याचे निराकारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेना उबाठाने दिला आहे.
शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, संजय पुनस्कर, सलील डाफळे, साजिद पावसकर, माजी नगरसेविका रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, किरण तोडणकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी बुधवारी सकाळी नगर परिषदेवर धडकले. यावेळी शहरातील विविध प्रश्नांवर मुख्याधिकार्यांशी चर्चाही झाली.
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता चांगला आहे परंतु रामआळी, मारुती आळी, तांबट आळी, तेली आळी नाका तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या परिसरातही खड्डे आहेत. निवखोल घाटी असो कि पेटकिल्ल्याकडे जाणारा रस्ता अनेक अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. हे खड्डे चिरा डबर न टाकता, पावसाळी डांबर वापरून त्वरित भरावेत. यापुढे अपघात झाल्यास जखमी नागरिकांची वैद्यकीय बिले नगर परिषदेने भरावी असा इशाराही दिला.
नवीन नळपाणी योजनेत अद्यापही सुधारणा झालेली नाही, अनेक ठिकाणी ती वारंवार फुटत आहे. विविध केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या मधून काही भागात चर खोदले जात आहेत. हे खोदलेले चर योग्य प्रकारे खडीडांबराने भरले जात नसल्याच्याही तक्रारी असून नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शहरातील काही भागात गटारी उघड्या पडल्या आहेत. दामले विद्यालय नव्याने काम करण्यात येत आहे. परंतु या शाळेकडे जाणार्या मार्गावरील गटार उघडे आहे. यात शाळेत जाणारा विद्यार्थी पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. एसटी कॉलनीकडे जाणार्या रस्त्यावरही काही ठिकाणी गटाराची झाकणे पडली आहेत. काही दिवसांपूर्वी दोन गुरे यात अडकून पडली होती. शहरात अनेक ठिकाणी असे प्रकार आहेत, आरोग्य विभागाने यात लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत या पदाधिकार्यांनी व्यक्त केले. मांडवी परिसराचे सुशोभिकरण केले जात आहे. परंतु पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात प्लॅस्टीक कचरा आलेला आहे. तो हटवण्याची मागणीही करण्यात आली.
शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून उपस्थित होत आहे. गतवर्षी गुरे पकडण्याची कारवाई करण्यात आली. आजही अनेक गुरे पेठकिल्ला नाक्यापासून साळवीस्टॉपपर्यंत रात्रीच्या वेळी रस्त्यात बसलेली असतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या गुरांना पकडून कोंडवाड्यात टाकावे व त्यांच्या मालकांवर कारवाई करावी अशा सूचनाही या पदाधिकार्यांनी केल्या. गुरांप्रमाणेच भटक्या कुत्र्यांचा त्रासही गंभीर बनला आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दोन्ही समस्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. पुढील पंधरा दिवसात विविध प्रश्नांवर नगर पालिकेने कोणतीही कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिला आहे.
मी काही रजनीकांत नाही…
मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उबाठाने दिलेल्या निवेदनावर लक्ष देऊ असे सांगितले. मात्र बोलण्याच्या ओघात आपण काही रजनीकांत नाही की आपल्या मागे काय चालले आहे हे दिसायला असे म्हणताच उबाठाचे पदाधिकारी संतप्त झाले व जोरदार शाब्दीक चकमक उडाली. यानंतर शहरप्रमुख साळुंखे यांनी सर्व पदाधिकार्यांना शांत केले. रत्नागिरी शहर स्मार्ट होत असताना मुख्याधिकारीही स्मार्ट असल्याचा टोलाही तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी यावेळी लगावला.