रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी:- प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जात असलेल्या रत्नागिरी येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. माजी आमदार बाळ माने यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन घेतले. या एकादशीनिमित्ताने शहरातील रामआळी ते विठ्ठल मंदिर दरम्यान जत्राच भरली होती.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या येथील श्री विठ्ठल मंदिरात गेली अनेक दशके परटवणे येथून पायी दिंडीची प्रथा सुरु असून यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. माजी आ. बाळ माने यांनीही या दिंडीत भाग घेत, सेवा दिली.
एकादशीनिमित्ताने मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागामधून मोठ्या संख्येने भाविक रत्नागिरी शहरात दाखल झाले होते. या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी जादा बसेसची सुविधाही एसटी महामंडळाने केली होती. एकादशीच्या दिवशी जत्रेमुळे बाजारपेठ सजली होती. रामआळी पासून गोखलेनाक्यापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यावर शेकडो छोटीमोठी दुकाने थाटण्यात आली होती.
रत्नागिरी शहर भाजपाच्यावतीने विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे साबुदाणा खिचडी व केळी यांचे सर्व भाविकांना वाटप करण्यात आले. या वेळी भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार मयेकर, मंदार खंडकर, दादा ढेकणे, दादा दळी, महेंद्र मयेकर यांच्यासमवेत महिला आघाडीच्या सुजाता साळवी, सोनाली आंबेरकर, संपदा तळेकर आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. माजी आ. बाळ माने व सौ. माधवी माने यांनी भाविकांना खिचडीवाटप केले.