रत्नागिरीतील शाळांमधील पोषण आहाराची चव बिघडली

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील काही शाळांमध्ये देण्यात येणार्‍या पोषण आहाराची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. काही दिवसांपासून काही शाळांतील आहाराची चव सुमार दर्जाची झाली असल्याचे विद्यार्थ्यांकडून पालकांना सांगितले जात आहे.

रत्नागिरी शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारांच्या डबे आणि टाक्यांची वाहतूक करताना दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे शाळांकडे जाणार्‍या वाहनांमधील आमटी व इतर पातळ पदार्थ त्या वाहनांच्या हौद्यात सांडून रस्त्यांवरही पसरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आहाराची चवही बदलली असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून पालकांकडे केल्या जात आहेत. सतत चवळी, वाटाणा कडधान्य शिजवून दिले आहे. आहारात ज्या वस्तू पाहिजेत त्या सर्वच असतात की नाही याबाबतही तक्रारी होत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने या पोषण आहार वाटपातील होणार्‍या अडचणींकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार पुरवला जातो. या आहारातील पदार्थ छोटे टेम्पो किंवा तत्सम वाहनातून शाळांकडे नेले जातात. शुक्रवारी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास किल्ला येथील भागेश्वर विद्यामंदिर शाळा क्र. 9 च्या विद्यार्थ्यांचा आहार घेऊन येणार्‍या टेम्पोतील आमटी रस्त्यावर सांडलेली दिसून आली. शाळेत हा टेम्पो गेल्यानंतर तेथील शिक्षिकांनीही आमटी सांडत असल्याचे चालकाला दाखवून दिले. रस्त्यांवर स्पीड ब्रेकरसह काही ठिकाणी खड्डे आहेत.

चढ-उताराचेही रस्ते असल्याने टेम्पोमधून जाणारा पोषण आहार सुरक्षितरित्या नेणे आवश्यक आहे. अशावेळी दक्षता न घेतल्याने अनेक पदार्थ सांडतात.
यापूर्वी प्रत्येक शाळेमध्ये पोषण आहार शिजवला जात होता. त्यामुळे त्यात गुणवत्ता होती. मात्र आता एकाच ठेकेदाराच्या नियंत्रणाखाली पोषण आहार शिजवून देण्याचे हे काम असल्याने पहिल्यासारखी गुणवत्ता राहिलेली नाही, असे काही शाळांतील विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे.