यावर्षीपासून शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार
रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे गतवर्षी रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी मिळाली होती. शंभर विद्यार्थी क्षमतेला यापूर्वीच मान्यता मिळाल्यानंतर आता वैद्यकीय महाविद्यालयासाठी 448 पदनिर्मितीस परवानगी देण्यात आली आहे. याकरीता 105.78 कोटी खर्चासह राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
याबाबत ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी नुकतीच माहिती दिली. रत्नागिरीत 100 विद्यार्थी क्षमतेच्या 430 खाटांच्या रुग्णालयाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सन 2023-24साठी केंद्राकडूनही हिरवा कंदिल मिळाला आहे. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासून प्रथमवर्षाचे प्रवेश सुरु होणार आहेत.
रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग येथील 500 खाटांच्या रुग्णलयाकरीता 1086 पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून 109.19 कोटी रुपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे. शासकीय महाविद्यालयामुळे कोकणाला दुहेरी आरोग्यदायी भेट मिळाली आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो डॉक्टर नवीन तयार होणार आहेत.
या शासकीय महाविद्यालयांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विशेषोपचार आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात बचत होणार आहे. कोकणातील ग्रामीण भागातील जनतेला याचा अधिक फायदा मिळणार आहे.