रत्नागिरीतील रस्ते काँक्रीटीकरणाला पंधरा दिवसात सुरुवात

ना. उदय सामंत; थिबापॅलेसवरील मल्टीमिडीया शोचे 26 जानेवारीला होणार लोकार्पण

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील 115 कोटींच्या सहा रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला येत्या पंधरा दिवसात सुरुवात होणार असून, थिबापॅलेस येथे सुरु होणार्‍या राज्यातील पहिल्या थ्रीडी मल्टीमिडीया शो प्रकल्पाचे लोकार्पण 26 जानेवारी केले जाणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी आपण जाहीर केलेले प्रकल्प पूर्ण करण्याला आपले प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की थिबापॅलेस येथे थ्रीडी मल्टी मिडिया शो प्रकल्पाचे काम हाती घैण्यात आले आहे. यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरीला पर्यटनद़ृष्ट्या महत्व वाढेल असेही त्यांनी सांगितले. याठिकाणी शोमध्ये प्रसिध्द अभिनेता नाना पाटेकर व अन्य हिंदी कलाकारांचे आवाज वापरण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. थिबापॅलेस नजीकच्या थिबा बागेसाठीही एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रत्नागिरीमध्ये 80 व्यक्ती बसतील अशा पध्दतीचे ध्यान केंद्र उभारले जाणार असून, त्यावर गोल्डनबुध्दाची मूर्ती उभारली जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी शहराच्या खालील भागात बागेबरोबरच एक स्विमींग पूलही उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात वारकरी संप्रदाय मोठ्याप्रमाणात असून, त्यांच्याप्रमाणेच अनेक विठ्ठल भक्त पंढरपूरला जात असतात. त्यांना विठ्ठलाची मूर्ती पाहता यावी यासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच विठ्ठल मूर्ती रत्नागिरीत उभारली जाणार आहे. माळनाका येथील बागेमधील जागा त्यासाठी निश्चित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर होता. त्यातील जवळपास गुरे पकडण्याचे काम सुरु आहे. त्यातील शेतीसाठी कुणाला गुरे पाहिजे असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या समिती याबाबत निर्णय घेणार आहे. कत्तलखान्यासाठी गुरे नेण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य लोकांना विवाहासाठी कमीतकमी खर्चात हॉल मिळावा यासाठी हॉल बांधण्यात येणार आहे. हिंदू व मुस्लीम धर्मियांसाठी वेगवेगळे हॉल बांधले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पोलीस वसाहत आणि मुख्यालयाची निविदा प्रक्रिया झाली असून पंधरा दिवसात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा पायाभरणी समारंभ केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.