रत्नागिरी:- कोरोना काळात श्री देव भैरीची मिरवणूक काढून शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिला. अकरा नागरिकांच्या वतीने ॲड. अविनाश ऊर्फ भाऊ शेट्ये यांनी युक्तीवाद केला. खटल्यातील माहितीनुसार कोरोना काळात संसर्गजन्य आजार पसरु नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मनाई व जमावबंदी कली होती. असे असताना ३० जून २०२० सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास श्री भैरीची पालखी मिरवणूक काढली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र या खटल्यादरम्यान दोघांचे निधन झाल्याची माहिती न्यायालयात दिली होती. ११ जणांवर गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते. नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवला नाही. त्यामुळे न्यायालयाने १३ जणांची निर्दोष मुक्तता केली.









