रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण गेल्या चार वर्षापासून बंद होते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास फारच वाढला. येत्या सोमवारपासून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु होणार आहे. कोल्हापूरच्या सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन संस्थेतर्फे हे काम केले जाणार आहे.
रत्नागिरी शहरात सन २०२०-२१ या कालावधीत १ हजार ३४४ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर हे काम बंद झाले होते. परिणामी, रत्नागिरी शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या फारच वाढली. शहरात कोणत्याही परिसरात घोळक्याने मुकाट कुत्र्यांच्या टोळ्यांचा हा वावर दिसून येत आहे. त्यांच्या भुंकण्यांच्या आवाजासह रडण्याच्या आवाजामुळे रत्नागिरीकरांना त्रास होत होता. रात्री-अपरात्री फिरणाऱ्यांसह दुचाकी स्वारांच्या अंगावर येण्याचे प्रकार वाढले आहे. आता या कुत्र्यांचा जन्मदर नियंत्रित होणार आहे. सोमवारपासून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे.