व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष; अनेकांकडून भिकमांगो आंदोलन
रत्नागिरीः– कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी बाजारपेठ दुपारनंतर बंद करण्यात आली. पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेत जावून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. परंतु शासनाच्या या निर्णयाला व्यापारी महासंघाने विरोध करत भीकमागो आंदोलन सुरु केले आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोरच ‘भीक देता का भीक’ असे फलक लावून शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविला.
रविवारी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घातल्याचे जाहीर केले होते. त्याबाबतचे लेखी आदेश सोमवारी प्राप्त झाले होते. परंतु प्रशासनाकडून निर्बंधांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली नव्हती. मंगळवारी दुपारी ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाल्यानंतर बाजारपेठा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सुचना बैठकीत देण्यात आली. त्यानूसार पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेत ध्वनीक्षेपणाद्वारे व्यापार्यांना दुकाने बंद करण्याची विनंती केली. त्यानूसार व्यापाऱ्यांनी बंद केली.शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत व्यापार्यांनी दुकाने बंद केली असली तरीहि शासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. गतवर्षी कोरोनामुळे व्यवसाय बुडाला. व्यापारी सावरलेला नसताना पुन्हा दुकाने बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत व्यापारी महासंघाने या निर्णयाचा निषेध केला आहे. कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते भरायचे कसे असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
जयस्तंभ येथील फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी स्टुडिओ बंद करुन बाहेर भीकमागो आंदोलन केले. आज बाजारपेठेत सर्वच व्यापारी भीकमागो आंदोलन करणार आहेत. शासनाच्या नव्या निर्बंधाना व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. यामुळे शासन कोणती भुमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.