श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग नामकरण
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील बांगलादेश हे नाव रत्नागिरी नगर परिषद नोंदणीतून काढून टाकण्यात यावे. तसेच या ठिकाणाला श्री देव विश्वेश्वर मंदिर मार्ग असे नामकरण करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी नगर परिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. मंगळवारी यासंबंधी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेवून नाव बदलण्याची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
शहरातील जयस्तंभ येथील पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी राजीवडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांगलादेश हे नाव रत्नागिरी नगर पालिकेच्या नोंदणीतून काढून टाकावे, अशा पद्धतीची अतिशय महत्वाची मागणी केली होती. पत्रकार परिषद घेतल्यानंतर तसे निवेदन त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना ते दिले. रत्नागिरी शहराच्या नोंदणीमधून बांगलादेश हे नांव काढून टाकण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून घेतला असून तसे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून हा मार्ग श्रीदेव विश्वेश्वर मंदिर मार्ग अशा पद्धतीचे नामकरण करावे, अशा देखील मी सूचना केल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शेवटी राजीवडा आणि श्री विश्वेश्वर मंदिर यांच्या मधल्या भागामध्ये जी वस्ती आहे, त्याला बांगलादेश या नावाने संबोधले जायचे, हे आपल्या देशाच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने आणि आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने व आपल्या रत्नागिरी शहराच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.









