रत्नागिरीतील तलाठ्याला जबाबदार धरत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रत्नागिरी:- माझ्या आत्महत्येला रत्नागिरीतील एक तलाठी जबाबदार आहे असा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकत शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील एका इसमाने विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

सदर इसम रत्नागिरी शहराजवळील एका सोसायटीत आपल्या पत्नी आणि मुलीसोबत राहतो. याच सोसायटीत राहणाऱ्या तलाठ्यासोबत पत्नीचे प्रेम संबंध उघड झाल्याचे कारण देत या इसमाने आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओत सांगितले आहे. आता या अत्यवस्थ इसमाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पत्नीचे आणि सबंधित तलाठ्याचे व्हॉट्स ॲपवरील चॅट या इसमाच्या नजरेस आले. यानंतर या तलाठ्याला काहीजणांनी जाब देखील विचारल्याचे बोलले जात आहे. मात्र यानंतर देखील हा इसम अत्यंत वाईट मनःस्थितीत होता. आज त्याने दुपारी एकच्या सुमारास आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकत शिवाजीनगर येथील एका गार्डनमध्ये जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. याबाबतची माहिती पोलिसांना कळतातच तातडीने त्याचे मोबाईल लोकेशन शोधत पोलीस या गार्डनमध्ये पोहचले व त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या इसमावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मी आत्महत्या करतोय या आशयाचा व्हिडीओ सदर इसमाने सोशल मिडीयावर टाकला आहे. याबाबत अधिक पोलीस तपास सुरु आहे.