रत्नागिरी:-/रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणित शिवसेनेकडून नुकताच झाला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चार ग्रा.पं.च्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. इतर राजकीय पक्षांनीही अशीच तयारी सुरु केली आहे.
तालुक्यात ऑक्टोबरमध्ये चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. फणसोप, शिरगाव, पोमेंडी बु. या मोठ्या ग्रामपंचायती असून चरवेली ही महामार्गावरील ग्रामपंचायत आहेत. या चारही ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व आतापर्यंत राहिलेले आहे. रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेमध्ये फाटाफुट झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून आता चार ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. या चारही ग्रामपंचायतीमध्ये मोठ्याप्रमाणात विकास कामे झाली असून, त्याचा फायदा कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
मतदार संघातील या चार ग्रामपंचायती असल्यानेया निवडणुकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले आहे. शिरगाव ही जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे फणसोप व पोमेंडी बु. ग्रामपंचायतीचाही विस्तार मोठ्याप्रमाणात झाला आहे. या ग्रामपंचायतींची लोकसंख्या वाढून त्या शहरीकरणाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांसह सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष या ग्रामपंचातींच्या निवडणुकीकडे केंद्रीत झाले आहे.
उद्योगमंत्री सामंत शनिवारपासून रत्नागिरीत दौर्यावर असताना त्यांनी चारही ग्रामपंचायतीमधील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली. पदाधिकार्यांना निवडणुकीबाबत सूचना केल्या. ना. सामंत यांनी लक्ष घातल्यामुळे अन्य पक्षातील नेतेमंडळीही आता सतर्क झाली आहेत.