रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामपंचायतस्तरावरील पहिला सौर प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे होत असून त्याचे काम अंतिम टप्प्याकडे नेण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर वेगाने कार्यवाही सुरु आहे. सुमारे 7 कोटी रुपये निधीतून उभा राहणाऱया या पकल्पाचे काम मार्च महिन्यात पूर्णत्वास जाउन विजनिर्मिती सुरू होईल अशी अपेक्षा जि.प.प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
अपारंपरिक ऊर्जा संसाधनांसाठी जिल्हा नियोजनमधील राखीव निधीतून ग्रामपंचायत स्तरावर ठिकठिकाणी सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. जिह्यातील पहिला प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे होणार आहे. त्याचे काम नुकतेच काही महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष पाठबळ मिळत असल्याचे जि.प.प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा सौरऊर्जा प्रकल्प अंतिम टप्प्याकडे गेला असून लवकरच मार्गी लागणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप पाठोपाठ गुहागर तालुक्यात जिल्ह्यातील दुसरा 1 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वरवेली येथील जागेचा सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच तांत्रिक मंजूरीसाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. वरवेली आणि गोळप येथील सौर प्रकल्प कार्यन्वित झाले तर पथदिपामुळे येणाऱ्या विजबिलात 40 टक्के बचत होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व पथदीपांचे (स्ट्रीट लाईट) महिन्याचे वीजबिल 60 लाख रुपये येते. वर्षाचे विजबिल सव्वासात कोटीवर जाते. अनेकवेळा विलबिलांसाठी निधी न मिळाल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे स्थानिक जनतेची गैरसोय होते. पथदीप आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची विजबिले भरण्यासाठी जिल्हा परिषदेचा सादिल निधीही तुटपुंजा पडतो. त्याला पर्याय म्हणून 1 मेगावॅट क्षमतेचे सौरप्रकल्प ठिकठिकाणी उभारण्याचा निर्णय जि.प.प्रशासनाने घेतला आहे.









