सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकरांकडून दाखल; सोमवारी सुनावणी
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्डेमय स्थिती याविरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. प्रथमेश गावणकर यांनी ही याचिका ॲड. असीम सरोदे आणि ॲड. श्रीया आवले यांच्यामार्फत दाखल केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र शासन), रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा परिषद रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि नगर विकास मंत्रालय यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.
याचिकाकर्ते प्रथमेश गावणकर यांनी सांगितले की, शहरासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही. गुहागर-चिपळूण, संगमेश्वर-देवरुख-साखरपा, आकेरी-हनमंत घाट, खेड-खोपी रस्ता यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील खड्डय़ांमुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वाईट रस्ते, खड्डे आणि धुळीमुळे लोकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राजकीय नेते आणि सत्ताधारी या समस्येकडे लक्ष देत नाहीत, अशा शब्दांत सामान्य नागरिकांचे दुःख याचिकेत स्पष्टपणे मांडले आहे, असे वरावडे येथील रहिवासी गावणकर यांनी नमूद केले.
खड्डेमय रस्त्यांमुळे सामान्य माणसांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे आणि उच्च न्यायालयाने अशा रस्त्यांच्या दुरावस्थेच्या प्रकरणांची गंभीर दखल घेण्यास सुरुवात केली असल्यो ॲड. असीम सरोदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ॲड. श्रीया आवले, ज्या स्वत चिपळूणच्या आहेत, त्यांनी चिपळूणसह संपूर्ण जिह्यातील रस्त्यांच्या परिस्थितीची बारकाईने माहिती घेऊन याचिकेत उल्लेख केला आहे. दर्जाहीन रस्त्यांमुळे मणक्याचे, कमरेचे दुखणे, वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ, धुळीमुळे हवा प्रदूषण आणि अपघातांमध्ये वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्हा आणि चिपळूण शहरातील नागरिकांना या त्रासातून मुक्ती मिळाली, तर आपल्या वकिलीचा चांगला उपयोग झाला असे आपण समजू, अशी भावना ॲड. आवले यांनी व्यक्त केली. या जनहित याचिकेची प्राथमिक सुनावणी 12 जानेवारी रोजी न्यायमूर्ती राजेंद्र अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्यासमोर होणार असल्याची माहिती ॲड. श्रीया आवले यांनी दिली आहे.









