रत्नागिरीतील क्रिकेटपटू प्रविण पवारचा मैदानावर हार्ट अटॅकने मृत्यू

रत्नागिरी:- क्रिकेटची मॅच खेळत असतानाच खेळाडूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीच्या चिंचखरी येथे घडली आहे. ही मॅच लाईव्ह दाखवली जात असल्यामुळे खेळाडू मैदानातच कोसळल्याचा व्हिडिओही रेकॉर्ड झाला आहे.  प्रवीण पवार असे या खेळाडूचे नाव आहे. परिसरात त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्थानिक क्रिकेट मॅच सुरू असताना प्रवीणच्या टीमची बॅटिंग सुरू होती आणि तो नॉन स्ट्रायकर एन्डला उभा होता. तेव्हाच प्रवीण अंपायरच्या अंगावर कोसळला. सुरूवातीला प्रवीणला चक्कर आल्याचे मैदानातील खेळाडू आणि प्रेक्षकांना वाटले. मैदानात असलेले खेळाडू, अंपायर आणि आयोजक ताबडतोब प्रवीणच्या दिशेने धावले आणि त्याला प्रथमोपचार दिले.

प्रवीण प्रथमोपचारांनाही प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रवीणचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. प्रवीण मैदानामध्येच कोसळला त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. प्रवीण पवार हा रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचा. स्थानिक क्रिकेटमध्ये प्रवीणने नाव कमावलं होतं, तसंच त्याने टीमला अनेक स्पर्धाही जिंकवून दिल्या होत्या.