रत्नागिरीतील काजळी नदीला पूर; चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेरा गावाला या वर्षीही पुराचा फटका बसला आहे. साखरपा भागात मुसळधार वृष्टी झाल्याने काजळी नदीला पूर आला आहे. यामुळे काल रात्रीच्या सुमारास चंदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. रात्रीच्या वेळेस पाणी भरल्याने या बाजारपेठेतील सुमारे १०० दुकानदारांची तारांबळ उडाली आहे. या गावातील विद्युतपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाण्याची पातळी अजूनही वाढत असून चांदेराई पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही घरात पाणी शिरले आहे, अशी माहिती चांदेराईचे माजी सरपंच दादा दली यांनी दिली आहे.

ढगफूटी सारख्या पावसानं रत्नागिरी तालुक्याला चांगलाच तडाखा दिला आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई, तोणदे, टेंबे, पोमेंडी, सोमेश्वर गाव बाधित झाली आहेत. चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली असून चार घरात पाणी शिरले आहे. सोमेश्वरकडे जाणार मार्ग पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. सलग दहा दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळं तालुक्यातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजळीचे पाणी धोका पातळीजवळ होते. काल रात्री पावसाचा जोर वाढला आणि पुराला सुरुवात झाली.

पुराच्या शक्यतेने चांदेराई ग्रामस्थ मध्यरात्री पासून जागेच होते. बाजार पेठेतील दुकान चालकांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी सुरवात केली. मध्यरात्री दोन वाजणायच्या सुमारास पाणी भरायला लागले. पावसाचा जोर वाढायला लागला तसे पाणी वाढू लागले. हरचेरी – चांदेराई मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पहाटे चांदराइ पुलावरून पाणी जाऊ लागले. 100 हुन अधिक दुकाने पाण्यात गेली आहेत. किनाऱ्यावरील चार घरात पाणी शिरले असून तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

काजळी नदीची पाणी पातळी 18 मीटरवर गेली आहे. या नदी किनारी वसलेल्या हातिस गावाला फटका बसला आहे. किनाऱ्यावरील प्रसिद्धी दर्गा परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. दर्गा मंडपात सुमारे तीन ते चार फूट पाणी होते. ते वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. टेबे पूल येथे पाणी भरले असून हातिस कडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तोंणदे कडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. सोमेश्वर मोहल्ल्यात पाणी आले असून तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे सोमेश्वर कडे जाणारे ग्रामस्थ राखडले आहेत. पावसाचा जोर कायम असल्यामुळे धोका वाढला आहे.

संगमेश्वरात पुरस्थिती!

संगमेश्वर बाजार पेठ, आठवडा बाजार, रामपेठ रोड, गणपती मंदिराजवळ, गद्रे वखार, भिडे वखार आदी भागात शास्त्री नदीचे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर कायम असून यावर्षीचा पहिलाच पुर चांगला दणका देण्याची चिन्ह आहेत. नदीकाठच्या घरांतुन नागरिकांनी स्थलांतर केले असून व्यापारीही आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. मुसळधार पावसामुळे फुणगुस परिसरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. फुणगुस आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे. फुणगुस कडून संगमेश्वरकडे जाणारा रस्त्यावर आंबेड येथे पाणी असल्यामुळे संगमेश्वरकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे त्यामुळे संगमेश्वरशी संपर्क तुटला आहे. मागील दोन वर्षात यावर्षीच शास्त्री नदीने पहील्यांदा धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे फुणगुस बाजारपेठेशी निगडीत असलेल्या आजूबाजूच्या गांवांचा संपर्क तुटला आहे