रत्नागिरी:- कोरोनामुळे बंद असलेला रत्नागिरीतील आठवडा बाजार तब्बल दीड वर्षानंतर सुरू झाला आहे. पाहिल्याच बाजारात मोठी गर्दी झाली नसली तरी नेहमीच्या बाजारातील भाज्यांचे दर आणि आठवडा बाजारातील भाज्यांचे दर यात कमालीची तफावत होती.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रत्नागिरीचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. तब्बल दीड वर्ष हा बाजार बंद होता. आता रुग्ण कमी झाल्याने तसेच अनेकांचे लसीकरण झाल्याने हा बाजार सुरु करावा, अशी मागणी जोर धरत होती. शनिवारपासून बाजार भरण्यास नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली होती.
या बाजारात येणार्या परजिल्ह्यातील व्यावसायिकांना लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले होते. परजिल्ह्यामधून अनेक व्यापारी आणि शेतकरी भाजी व अन्य माल घेऊन आठवडा बाजारात विक्रीसाठी आले होते. आठवडा बाजारापासून अगदी रहाटागरापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या
होत्या.
दीड वर्षानंतर पहिल्यांदाच भरलेल्या आठवडा बाजारात भाजी, फळे, कपडे, हत्यारे, किरकोळ सामान, घरगुती सामान यांची दुकाने दुकानदारांनी थाटली होती. भाजी आणि अन्य सामानांच्या किंमतीत नेहमीच्या बाजाराच्या तुलनेत निम्म्याने तफावत होती. कांदेबटाटे 20 रुपये किलो, टोमॅटो 30 रुपये किलो, फरसबी, गवार 80 रुपये किलो, मटार 120 रुपये किलो, मेथी, पालेभाजी, कोथिंबीर आदींची जुडी 10 रुपये, कोबी 10 ते 20 रुपये नग, फ्लॉवर 10 ते 25 रुपये नग असा दर होता.