रोहा येथे खो-खो स्पर्धा
रत्नागिरी:- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलींमध्ये पुणे, ठाणे, सांगली यांनी तर कुमार गटात उस्मानाबाद, पुणे ठाणे, मुंबई उपनगर, सांगली यांनी बाद फेरीत प्रवेश केला.
धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर सुरु असलेल्या सामन्यात मुली गटात रत्नागिरी संघाने साताऱ्यावर एक डाव 2 गुणांनी (24-13) मात केली. विजयी संघातर्फे पायल पवार (3.30 मी, 2 मी. संरक्षण व 2 गुण), श्रेया सनगरे (2.50 मी, 3 मी. संरक्षण व 2 गुण ), आर्या डोर्लेकर (2 गुण ) यांनी तर सातारा तर्फे गीतांजली जाधव (1.40 मी. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात पुणेने धुळे चा 21 गुणांनी (28-7) पराभव केला. पुणेतर्फे मानसी हरगणे (2.30 मी. संरक्षण ), प्रेरणा कांबळे (3.30 मी. संरक्षण ), दिपाली राठोड (4 गुण ) असा खेळ केला. तर धुळे तर्फे हंसिका पाटील (1.40 मी., 1.30 मी संरक्षण व 2 गुण ) हिने एकतर्फी लढत दिली. तिसऱ्या सामन्यात ठाणे संघाने जालना चा 20 गुणांनी (23-3) असा पराभव केला. ठाणे तर्फे प्रीती हलगरे (2.30 मी. संरक्षण ), सान्वी तळवडेकर (2.30 मी. संरक्षण, 1 गुण ), कल्याणी कंक (7 गुण ) असा खेळ केला. पराभूत जालना संघातर्फे श्रद्धा चांदने (1 मी. संरक्षण ) चांगला खेळ केला. उर्वरित काही सामन्यात अहमदनगर ने औरंगाबादचा 2 मी. आणि 7.20 गुण राखून तर सांगली ने मुंबई उपनगरचा 1 डाव 11 गुण राखून (15-4) असा पराभव केला.
कुमार गटातील साखळी सामन्यात उस्मानाबाद संघाने धुळे संघावर एक डाव 4 गुण राखून मात केली. विजय संघातर्फे भरतसिंग वसावे (2.10 मी. संरक्षण, 3 गुण ), सचिन पवार (2 मी. संरक्षण, 2 गुण ) यांनी तर धुळे संघातर्फे जयेश फुलपागरे (0.40 से. संरक्षण, 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात ठाणे संघाने परभणी चा 1 डाव 3 गुणांनी (12-9) असा पराभव केला. त्यात राज संकपाळ (3.30 मी. संरक्षण, 1 गुण ), सुरज मोरे (3.20 मी., संरक्षण ) असा खेळ करत विजय मिळवला. धुळे तर्फे नितीन खाटिंग (1.40 मी., संरक्षण व 1 गुण ) ने चांगला खेळ केला. तिसऱ्या सामन्यात पुणे ने मुंबई चा 1 गुण आणि 6.30 मिनिटे (17-16)
राखून पराभूत केले. पुणेकडून विवेक ब्राहमाने (2.20 मी., 1.40 मी. संरक्षण व 3 गुण ), आकाश गायकवाड (1 मी., 1 मी., व 5 गुण ) असा खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली. पराभूत मुंबई तर्फे जनार्दन सावंत (1.20 मिनीटे व 3 गुण ), रोहित केदारे ( 1 मी., 1 मी., व 4 गुण ) यांनी चांगली लढत दिली.
उर्वरित सामन्यात सांगली ने रायगड चा (18-9) असा पराभव केला. मुंबई उपनगर ने नंदुरबारचा1 डाव 9 गुण (20-11) असा, सोलापूर ने नाशिकचा (13-12) 1 गुण 5.20 मिनिटे राखून पराभूत केले.









