रत्नागिरी:- रत्नागिरीच्या महिला संघाने चुरशीच्या सामन्यात सांगलीवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या व्यतिरिक्त उस्मानाबाद, पुणे, ठाणे, सांगली व मुंबई उपनगर या संघानी वरिष्ठ गट ५७ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
वेळापूरच्या पालखी मैदानावर शनिवारी सकाळच्या सत्रात महिला गटाचे सामने झाले. रत्नागिरी विरुद्ध सांगली यांच्यात झालेल्या उपउपांत्य सामन्यात रत्नागिरी संघाने 4 गुणांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यन्तरला रत्नागिरीकडे 4 गुणांची आघाडी होती. रत्नागिरीतर्फे अपेक्षा सुतार 2.30 मी., 1.50 मी. सवरक्षण करत 5 खेळाडू बाद केले. आरती कांबळेने 1.40 मी. 2.30 मी. खेळ करत 4 खेळाडू बाद केले. पायल पवार 1.30 मी., 1 मी, 2 खेळाडू बाद केले. श्रेया सनगरे 1.30, 1.40 मी खेळ केला तर पल्लवी सनगले 2 मिनिट तर माधवी बोरसुतकर ने महत्वपूर्ण खेळ करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
उर्वरित सामन्यात उस्मानाबादने सातारावर १३-८असा डावाने दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या वैभवी गायकवाडने आपल्या धारदार आक्रमणात ५ गडी टिपले. आश्विनी शिंदे ( ४.००,१.३०), नम्रता गाडे (२.३०) व किरण शिंदे (२.००) यांनी संरक्षणाची खेळी केली. साताराच्या मयुरी जाधवने एक मिनिटे पळती तर संचिता बोडरे हीने दोन बळी टिपले.
दुसऱ्या सामन्यात पुण्याने सोलापूरला १०-७ असे डावाने हरविले. पुण्याच्या प्रियंका इंगळेने (३.२० मिनिटे व ४ गुण) अष्टपैलू खेळी केली. प्रिया भोर हीने नाबाद तीन तर कोमल दारवाटकर हीने ३.१०मिनिटे पळती केली. सोलापूरच्या प्रीती काळे(१.४०) व संध्या सुरवसे (१.२०,१.४० मिनिटे) यांचे प्रयत्न अपुरे पडले. अन्य सामन्यात रेश्मा राठोडच्या (३.१० मिनिटे व २गुण) अष्टपैलू खेळामुळे ठाणे जिल्ह्याने मुंबई उपनगरला १०-८ असे डावाने नमविले. रत्नागिरीने सांगलीस १५-१२असे पराभूत केले. मध्यंतरची १०-६ ही आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. अष्टपैलू कामगिरी करणारे अपेक्षा सुतार (२.५०,१.५० व ४ गुण) व आरती कांबळे ( १.३०, १.३० व ४गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पुरुष गटात अरुण गुनकीच्या (१.३०व २.०० मिनिटे व ४गुण) अष्टपैलू कामगिरीमुळे सांगलीने सोलापूरचा १८-१६ असा डावाने पराभव केला. सोलापूरकडून रामजी कश्यप, राहुल सावंत, अक्षय इंगळे, विनीत दिनकर यांनी प्रत्येकी ३गडी टिपले. दुसऱ्या सामन्यात पुण्याने उस्मानाबादवर १७-११ अशी डावाने एकतर्फी मात केली. त्यांच्या मिलिंद करपे याने पाच गडी बाद केले. राहूल मंडलने २.२० व अभिषेक खेंडेकर २.०० मिनिटे पळती केली. अन्य सामन्यात ठाण्याने मुंबईवर १८-१७ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळविला. त्यांच्या लक्ष्मण गवस व शुभम उत्तेकर त्यांनी प्रत्येकी दोन मिनिटे पळती करीत तीन गडी टिपले. हर्षद हातणकरच्या (१.००,१.२० मिनिटे व ३गुण) अष्टपैलू खेळामुळे मुंबई उपनगरने अहमदनगरला १५-१३ असे ७.३०मिनिटे राखून हरविले. अहमदनगरच्या आकाश ढोले(१.४० मिनिटे व ३गुण) याची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.









