जगात उरलेत केवळ ७०० पक्षी
रत्नागिरी:- जागतिक स्तरावर ‘अत्यंत धोक्यात’ (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून नोंदणी असलेल्या ‘तणमोर’ पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्यातील एका पठारावर सोमवारी, २६ मे रोजी दर्शन झाले. रत्नागिरीचे पक्षी निरीक्षक ॲड. प्रसाद गोखले यांनी हा दुर्मिळ पक्षी पाहिला. या महत्त्वाच्या घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पठारी भागाच्या संवर्धनाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
भारतात स्थानिक असलेला ‘तणमोर’ (लेसर फ्लोरिकन) हा पक्षी जगातील केवळ ३०० ते ७०० नरांच्या संख्येने अस्तित्वात आहे. अशा ‘अत्यंत धोक्यात’ असलेल्या प्रजातीतील मादी तणमोराची नोंद रत्नागिरीच्या पठारावर झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. ॲड. गोखले हे नेहमीप्रमाणे पक्षीनिरीक्षणासाठी गेले असताना त्यांना ही मादी तणमोर अन्न शोधताना दिसली. त्यांनी तातडीने तिचे छायाचित्र घेतले.
तणमोर पक्षी प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रजनन करतात आणि पावसाळ्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात स्थलांतर करतात. सध्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून त्यांचा परतीचा प्रवास सुरू असल्याची माहिती ‘कॉर्बेट फाउंडेशन’चे संचालक केदार गोरे यांनी दिली. प्रवासादरम्यान खराब हवामानामुळे ही मादी रत्नागिरीत भरकटलेली किंवा विश्रांतीसाठी थांबलेली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
तणमोरांच्या अधिवासासाठी आवश्यक असलेल्या गवताळ प्रदेशांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. तसेच, वीजवाहक तारांचाही या पक्ष्यांना धोका आहे, कारण स्थलांतरादरम्यान रात्रीही प्रवास करत असल्याने ते तारांमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात. ‘दी कॉर्बेट फाउंडेशन’ने गुजरात वन विभागाच्या मदतीने उपग्रह टॅगिंग केलेला ‘एलएफएम-९’ हा नर तणमोर पक्षी स्थलांतरादरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, पुरंदर आणि बारामती या तालुक्यांमधील गवताळ प्रदेशात थांबल्याची नोंद आहे. यापूर्वी १८८०, १९०७, १९०८, १९१३ आणि १९३८ या काळात कोकणातील अलिबाग, पनवेल, चिपळूण तालुक्यांमधून तणमोर पक्ष्याची नोंद झाली होती.
तणमोर हा साधारणपणे कोंबडीएवढा, ४५ सेंमी उंचीचा छोटा पक्षी आहे. नर आणि मादी दिसायला मातकट रंगाचे असून त्यांच्यावर तुटक काळ्या रेषा असतात. मात्र, विणीच्या हंगामात नराच्या डोक्यामागे एक तुरा येतो आणि त्याच्या पाठीमागून पिंगट काळा, पोटाकडे काळा, तसेच मानेवर आणि पंखांमध्ये पांढरा रंग असा बदल होतो. या पक्ष्याचे शेपूट आखूड असते. पावसाळी हंगामात यांच्या विणीचा काळ असतो. या काळात नर मादीला आकर्षित करण्यासाठी साधारण चार फुटांच्या उड्या मारतो, तेव्हा तो दृष्टिपथात येतो. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसल्याने तो जमिनीवर घरटे बांधतो आणि त्यात साधारण दोन ते चार अंडी घालतो. गवताळ माळराने आणि कोरडवाहू शेतीसारख्या अधिवासांमध्ये हा पक्षी आढळतो. तो अत्यंत सावध आणि लाजाळू असल्याने सहसा दिसत नाही.