18 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धा होणार बेंगलोरला
रत्नागिरी:- कर्नाटक बंगलोर येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रत्नागिरीच्या दिव्या पाल्ये हिची निवड झाली आहे.
येत्या 31 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत बंगळुरू, कर्नाटक येथे होणाऱ्या 44व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दिव्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही निवड अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धे करण्यात आली आहे. निवड समिती सदस्य श्रीनिवास मेतरी (रायगड), मनोज परदेशी (नंदुरबार), योगेश सोळसे (बीड) व राखी जोशी (पुणे) यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या संघाची घोषणा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केली.
दिव्या पाल्ये हिने यापूर्वी गया येथे शासनाच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्येही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तिला राष्ट्रीय प्रशिक्षिक पंकज चवंडे व रा. भा. शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद मयेकर यांनी मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल आर. ए. सोसायटीच्या शिल्पाताई पटवर्धन, सतिश शेवडे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.









