रत्नागिरीच्या जेल नाका येथे तिहेरी अपघात; वाहतुकीवर परिणाम

रत्नागिरी:- शहरातील जेल नाका या वर्दळीच्या ठिकाणी आज शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सकाळी तीन वाहनांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातामुळे तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या तिहेरी अपघातात एक पिकअप व्हॅन, कंटेनर आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. अपघाताचा जोर मोठा असल्याने तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, अपघातामुळे जेल नाका परिसरातील मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघात झालेली वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत.