रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा ; महाराष्ट्र महिला संघाला सुवर्णपदक

रत्नागिरी:- उस्मानाबाद येथे झालेल्या यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघाने 55 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलु खेळ करणार्‍या महिला संघातील महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या रत्नागिरीच्या अपेक्षा सुतारला मानाच्या राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघाचा 11-9 असा डावाने विजय मिळविला. यामध्ये महाराष्ट्राकडून प्रियांका इंगळे (3.30 मिनिटे व 2गुण), अपेक्षा सुतार ( 2.2 व 1.10मिनिटे व 1 गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. पूजा फरगडे हीने 4 गडी बाद करीत आक्रमणाची बाजू सांभाळली. दुसर्‍या डावातही रेश्मा राठोड 2.20 व दिपाली राठोड हीने 2.30 मिनिटे संरक्षण केले. भारतीय विमान प्राधिकरण संघाकडून वीणा (1.10 मिनिटे नाबाद), ऋतुजा खरेने (1.20 मिनिटे), जान्हवी पेठे हीने (1.00 मिनिटे व 1 गुण) संरक्षण करीत एकाकी लढत दिली. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करत विजयात महत्त्वाची भुमिका बजावणारी रत्नागिरी जिल्ह्याची राष्ट्रीय खो-खो पटू अपेक्षा सुतार हिला मानाचा समजला जाणारा राष्ट्रीयस्तरावरील राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यापुर्वी हा पुरस्कार रत्नागिरीची आंतरराष्ट्रीय खेळाडू ऐश्‍वर्या सावंतने पटकावला होता. हा पुरस्कार मिळवणारी अपेक्षा जिल्ह्याची दुसरी खेळाडू आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणार्‍या राज्य संघात रत्नागिरीची आरती कांबळे आणि श्रेया सनगरे यांचाही समावेश होता.

यशस्वी खेळाडूंचे फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्याचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, माजी सचिव संदिप तावडे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर, प्रशांत देवळेकर, प्रसाद सावंत, राजेश कळंबटे, पत्रकार राजेंद्र चव्हाण, राजेश चव्हाण, सचिन लिंगायत, भाऊ पाल्ये, सुरज आयरे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेने यजमान महाराष्ट्रावर 14-12 असा 45 सेकंद राखून  विजय मिळवित हॅटट्रिक केली. रेल्वेचे हे 11 वे विजेतेपद आहे.