रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती झाली आहे. माजी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली झाल्याने ही जागा रिक्त होती. छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त असलेले बगाटे हे डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील रहिवासी असलेले बगाटे यांनी आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात खासगी कंपनीत काही काळ नोकरी केली. सुरुवातीला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बगाटे यांनी नंतर आयपीएस परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस सेवेत प्रवेश केला. २०१८ ते २०२० या कालावधीत ते परभणी येथे प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. परभणी, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग येथे त्यांनी आपल्या दबंग कामगिरीने ख्याती मिळवली आहे.
परभणी येथे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बगाटे यांची तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी बाचाबाची झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेत डी झोनमध्ये शिरलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याने हा वाद उद्भवला. तसेच, वाळू टिप्पर पकडल्यावरून त्यांचा खासदार संजय जाधव यांच्याशीही वाद झाला होता. या घटनांनी त्यांची कणखर अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली.