26 मार्चला पहिली शिपमेंट, सातशे डझन आंबा प्रक्रिया केंद्रात
रत्नागिरी:- यंदा हापूसचे उत्पादन अत्यंत कमी असले तरीही त्यावर मात करुन रत्नागिरीतून कतार आणि इंग्लंडला पहिली शिपमेंट 26 मार्चला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील तीन बागायतदारांकडील सुमारे सातशे डझन हापूस आंबा प्रक्रिया केंद्रात दाखल झाला आहे.
आंबा निर्यातीसाठी बागातयदारांना वाशी आणि लासलगाव येथील प्रक्रिया केंद्राकडे जावे लागत होते; मात्र रत्नागिरीत ही व्यवस्था दिल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला. गतवर्षी कोरोनामुळे आंबा निर्यात कमी करण्यात आला. यंदा लवकरात लवकर निर्यात व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यासाठी पणन विभागाने हे प्रक्रिया केंद्र सद्गुरु एंटरप्रायझेसला चालविण्यासाठी दिले होते. त्यानुसार पहिली शिपमेंट पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे. आंबा वॉशिंग, ब्रशिंग करुन तो योग्य तर्हेने पॅकिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करुन इंग्लंडसह आखाती देशातील कतारला हा पाठविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या एंटरप्रायझेसकडून घेण्यात आल्या आहेत. रत्नागिरीत प्रक्रिया केल्यानंतर वातानुकूलीत व्हॅनने मुंबईत विमानतळावर पाठविण्यात येईल. तिथून विमानाने पुढे पाठविण्यात येणार आहे.
वातावरणातील बदलांचा परिणाम हापूसवर मोठ्याप्रमाणात झाला आहे. उत्पादनही अत्यंत कमी आहे. या परिस्थिती स्थानिक पातळीवर आंब्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातील आवश्यक माल एवढ्या लवकर मिळणे अशक्य आहे. या परिस्थितीत काही बागायतदारांनी सकारात्मक निर्यातीसाठी सकारात्मक पवित्रा घेतला आहे. त्यामुळेच मार्चच्या अखेरीस निर्यातीला सुरवात होणार आहे.









