रत्नागिरीकर पुन्हा सायकलवर; लॉकडाऊननंतर मागणीत प्रचंड वाढ

रत्नागिरी:- प्रवास आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी साधायला मदत करते ती म्हणजे सायकल, पण जर सध्या रत्नागिरीत चांगल्या ब्रॅण्डची सायकल विकत घेण्याच्या विचारात असणाऱ्यांना प्रतिक्षाच करावी लागत आहे. कारण रत्नागिरीत सध्या सायकलची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनच्या काळात गेल्या चार महिन्यांत जगभरात सायकलची रेकॉर्डब्रेक विक्री झाल्यानं रत्नागिरीसह सर्व शहरांमध्ये सध्या हीच अवस्था आहे.

सायकलनिर्मात्यांची राष्ट्रीय संघटना असणाऱ्या ‘ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार (एआयसीएमए) मे ते सप्टेंबर २०२० या पाच महिन्यांच्या कालावधीत देशात एकूण ४१ लाख ८० हजार ९४५ सायकलींची विक्री झाली आहे.
 

या पाच महिन्यांत रत्नागिरीत देखील सायकलींच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे. सायकलींच्या काही दुकानात जाऊन पाहणी केली असता, कमी वजनाच्या आणि ‘गीअर’च्या चांगल्या दर्जाच्या सायकलींसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून आले. मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यल्प असल्याने ग्राहकांना त्यांच्या पसंतीची सायकल उपलब्ध होत नाहीत. 

शहरात सायकलींचे मोजकेच मोठे विक्रेते आहेत. लॉकडाउनमध्ये काही महिने दुकाने बंदच होती. दुकाने उघडल्यानंतर कमी काळात अधिक सायकलींची विक्री झाली. मागणीत पूर्वीच्या तुलनेत सध्या ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, पुरवठा कमी असल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

व्यायामासाठी ‘सायकलिंग’ला पसंती लॉकडाउनमुळे गेले सहा महिने बहुतांश व्यापारी, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्मचारी घरूनच (वर्क फ्रॉम होम) काम करीत होते. पूर्वीच्या तुलनेत त्यांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे अनेक जण स्वत:ला ‘फीट’ ठेवण्यासाठी ‘सायकलिंग’चा पर्याय निवडत आहे. जिम, जलतरण तलाव, योगा सेंटर किंवा व्यायामासाठी अन्यत्र जाणारा वर्गदेखील आता सायकलकडे वळाला आहे.