१० हजार २८८ मीटर बसवणार
रत्नागिरी:- भविष्यात सुरू होणाऱ्या सुधारित पाणीयोजनेचे पाणी शहरवासीयांना जपून वापरावे लागणार आहे. हजार लिटरला ८ रुपये याप्रमाणे पाणीपट्टी आकारली जाणार आहे. त्यासाठी शहरात १० हजार २८८ पाणी मीटर पालिकेमार्फत मोफत बसवण्याचे काम सुरू झाले आहे. त्याची सुरवात प्रभाग क्र. ५ मधून झाली आहे. मीटरसाठी पालिकेने अडीच कोटी रुपये दिले आहेत.
शहरामध्ये सुधारित पाणीयोजनेचे श्रेयवादातून अडलेले काम अखेर सुरू झाले. दोन वर्षांची मुदत असलेली ही पाणीयोजना चार वर्षे झाली तरी अजून अपूर्णच आहे. पाणीयोजनेचे पाइप टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरीवरून शहरातील रस्त्यांची वाताहात झाली. भाजपसह अन्य विरोधकांनी हा विषय लावून धऱला. चार ते सहा महिने शहरवासीयांना खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावरून कसरत करत जावे लागत होते. शिवसेना सत्ताधाऱ्यांनी शहरातील सुमारे सव्वाशे किमीचे सर्व रस्ते करण्याचे पूर्ण नियोजन केले होते; मात्र पाऊस, गॅस कंपनीची पाइपलाइन, महावितरणच्या भूमिकेत वाहिन्या आदींमुळे हा विषय मागे पडत गेला. अखेर ज्या भागात ही सर्व कामे पूर्ण झाली त्या भागात रस्त्यांची कामे करण्यास सुरवात झाली आहे. शहरातील वरच्या भागातील रस्ते झाले असले तरी खालच्या भागातील रस्त्यांचे काम अजून अपूर्ण आहे. पाणीयोजनेचे काम आता जवळजवळ पूर्ण झाले आहे. जोडण्या काढून ठेवल्या आहेत. त्याची चाचणी घेऊन लवकरच पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.
यापूर्वी नळाला पाणीमीटर नसल्याने किती पाण्याचा वापर झाला याची मोजदाद होत नव्हती. यामध्ये पालिकेचा मोठा तोटा होत होता; मात्र नव्या योजनेमध्ये पाण्याचे ऑडिट होणार आहे. शहरातील सव्वादहा हजार नळजोडण्यांना पाणीमीटर बसवण्यात येणार आहेत. ही आयएसओ मानांकित मीटर आहेत.
एक मीटरसाठी सुमारे दोन हजार रुपये
एक हजार लिटर पाण्याला ८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. एक मीटर बसवण्याचा सुमारे दोन हजार रुपये खर्च आहे. मीटरला कंपनीने ३ वर्षाची हमी दिली आहे. ठाण्याची माना इलेक्ट्रॉनिक ॲण्ड इंजिनिअरिंग कंपनी हे काम करत आहे.