रत्नागितील शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवण्याचा निर्णय

रत्नागिरी:- उष्म्याच्या झळांनी रत्नागिरीकर प्रचंड त्रस्त झाले आहेत; मात्र विदर्भाप्रमाणे उष्माघाताची स्थिती जिल्ह्यात भासत नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात ७ ते १२.३० या कालावधीतच सुरु राहतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यावरुन पालकवर्गच नव्हे तर शिक्षक संघटनांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्यामुळे शाळांच्या वेळेसंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा काही ठिकाणी शाळा विलंबाने सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी एप्रिलअखेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाका वाढला आहे. सकाळी दहा वाजल्यानंतर त्याची तिव्रता जाणवते. भारतीय हवामान विभागासह आरोग्य विभागाकडूनही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शाळा सकाळी ७ ते १२.१० वाजेपर्यंतच ठेवण्याचा निर्णय झाला आहे; परंतु जिल्हाप्रशासनाशी निर्णय घेऊन स्थानिक पातळीवर उष्णतेचा परिणाम लक्षात घेऊन शाळांच्या वेळेबाबत निर्णय घ्यावयाचा होता. शाळांची वेळ ११ वाजेपर्यंत घ्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. याबाबत शिक्षण विभागाने प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात उष्माघाताला कारणीभुत ठरेल अशी स्थिती नाही. जिल्ह्याचा पारा ३३ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर आहे. त्यामुळे शाळांची वेळ जैसे थेच राहील असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हापरिषदेच्या अडीच हजार शाळा असून सुमारे पाऊण लाख विद्यार्थी कार्यरत आहेत. दुपारच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर भर उन्हातून विद्यार्थ्यांना घरी परतावे लागते. त्यामुळे पालकांमधूनही तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.