रत्नागिरी:- चिपळूणमध्ये महापुराचे पंधरा ते वीस फूट पाणी, पावसाचा जोर, विजेच्या तारा, वाहत येणारे लाकडाचे ओंडके यांचा सामना करत रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले. पोलिसांच्या सूचनेनुसार खेर्डी येथील एक किलोमीटरच्या परिसरात सायंकाळी ४ ते रात्री अकरा वाजेपर्यंत ७० जणांना सुरक्षितस्थळी नेण्यात यश मिळाले.
प्रथम एक तीन मजली इमारत निश्चित करून आसपासच्या परिसरातील लहान घरे शोधली व तिथे अडकलेल्याना सुखरूप बोटीतून या इमारतीमध्ये आणले. यामध्ये छोट्या घरांत अडकलेल्या लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि काही रुग्णांना यशस्वीपणे मोठ्या इमारतींमध्ये सुरक्षित नेले. चिपळुणात सर्वप्रथम पोहोचणारी ही पंधराजणांची प्रशिक्षित टीम ठरली. सोबत गावखडीतील पुराच्या पाण्यात होडी चालवणारे अनुभवी व पट्टीचे पोहणारे ड्रायव्हरही होते. ही टीम राई, भातगाव, आबलोलीमार्गे सायंकाळी ४ वाजता चिपळूणला पोहोचली. सोबत बोट, ट्रक आणि आरटीओची गाडीही होती. रेस्क्यूसाठी एकच फायबर बोट मिळाली. पाण्याच्या खडतर प्रवाहात प्रशिक्षित व पारंगत होडीचालकांमुळे रत्नदुर्गची टीम तग धरू शकली. काही वेळा महावितरणच्या विजेच्या ताराही बाजूला कराव्या लागल्या. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने सोबत रस्सी, दोरखंड यासह लाईफ जॅकेट व अन्य साधनसामग्री घेतली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने मजबूत, दर्जेदार आणि चांगल्या क्षमतेचे इंजिन असणारी बोट दिल्यामुळे या महापुरात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले.
बोट पलटी होऊ नये म्हणून नागरिकांना बोटीत बसवत आणि दोन्ही बाजूंनी पोहत जात. हे प्रशिक्षित स्वयंसेवक वेगवेगळ्या दिशांना पोहत जात जवळच्या घरांमध्ये कितीजण अडकले आहेत याची माहिती घेत व तिथे बोट नेत होते. यामुळे वेळ वाचला. या बचावकार्यानंतर दोन तास पायी प्रवास करून पोलिस ठाणे गाठले. त्यांच्यासमवेत पोलिस कॉन्स्टेबल अभिजित सकपाळ हे सुद्धा होते. रत्नदुर्गच्या कामाची दखल मंत्री उदय सांमत यांनी घेताना कौतुक केले.
लहान मुलांना प्राधान्य
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रथम लहान मुले, महिला, वृद्धांना प्राधान्य दिले. यामध्ये दीड महिन्याच्या बाळापासून अगदी १०१ वर्षांची आजी आणि काही रुग्णही होते. या साऱ्यांना वाचवण्यात रत्नदुर्गच्या टीमला मानसिक समाधान मिळत होते. रत्नदुर्गचे हे काम पाहताना घरात अडकलेल्या काही महिलांनी चहा देतो, असे सांगितले तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. बचावलेल्या काही व्यक्तींनी मानधनही देण्याची तयारी दाखवली .
.. तर आणखी काही तास बचावकार्य केले असते
चार-पाच तासांच्या बचावकार्यात पाण्याचा अंदाज येत होता. रात्री साडेदहाच्या सुमारास बचावकार्य थांबवण्यात आले. पाऊस आणि वाढते पाणी आणि काळोखामुळे बचावकार्यात अडथळे येत होतेच. सर्च लाईट व पेट्रोल उपलब्ध होऊ शकले नाही त्यामुळे आणखी बचावकार्य करता आले नाही.
टीम रत्नदुर्ग
रत्नदुर्ग माउंटेनिअर्स रेस्क्यू टीममध्ये विरेंद्र वणजू, गणेश चौघुले, गौतम बाष्टे, किशोर सावंत, पराग सुर्वे, सनील डोंगरे, चिन्मय सुर्वे सहभागी झाले तसेच मदतीला गावखडीतील अनुभवी आणि पट्टीचे पोहणारे टीममध्ये निनाद पाटील, जयदीप तोडणकर, अब्बास दरवेश, अयुब दरवेश, फजल पांढरे यांचा समावेश होता.
.. अन् बोट अडकली
पाणी सुमारे पंधरा फुटांच्या वर होते. बोट तीन-चार वेळा अडकली होती. एकदा तिथे ट्रकच्या टपात नंतर एका घराच्या कौलांना लागली व एकदा इमारत बांधकामासाठी लावलेल्या पत्र्यांनाही लागली. काल दुसऱ्या दिवशी त्याच भागातून जाताना आपली बोट कुठे असेल, याचा अंदाज घेतल्यानंतर आश्चर्य वाटल्याचे रत्नदुर्गच्या सदस्यांनी सांगितले.









