दहा दिवसानंतरही शोध नाही, पावसामुळे शोधकार्यात अडथळा
रत्नागिरी:- शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा अद्याप शोध लागला नाही. २९ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास या तरुणीने खाली उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिसात नोंदवण्यात आले होते. मागील १० दिवसात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलीस जवान माऊंटेनिअर्सची टीम, एनडीआएफ यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र सर्व संसाधने वापरुनही या तरुणीचा शोध लागला नाही. पावसाळ्यामुळे समुद्राला उधाण असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक येथे बँकेत नोकरीला असणारी सुखप्रित धालिवाल ही आपल्या मित्राला भेटण्यासाठी २९ जून रोजी रत्नागिरीत आली होती. यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तिने आपले चप्पल व स्कार्फ बाजूला ठेवले आणि रेलिंगच्या पुढे गेली. तसेच यानंतर तिने कठड्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिसात नोंदवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तिचे नातेवाईक रत्नागिरीत दाखल झाले होते. सुखप्रित हिच्या वडिलांनी या प्रकरणी संबंधित मित्राने माझ्या मुलीला फसविल्याचा ठपका ठेवून त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुखप्रित हिच्या मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
सुखप्रित हिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप ती सापडून न आल्याने तपास कामात अडथळा निर्माण होत आहे. सुखप्रित ही नाशिक येथे वास्तव्यास असताना तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने आपली व्यथा मांडली होती. दरम्यान पोलिसांकडून १० दिवसात विविध मार्गाने शोधमोहीम राबवली होती. समुद्रकिनारी भागात लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र सुखप्रितबाबत पोलिसांना कोणतीही माहिती मिळू शकली नाही.