रत्नदुर्ग, किल्ला परिसरात सापडली ऐतिहासिक समाधीस्थळे

रत्नागिरी:- शहराजवळील रत्नदुर्ग व पेठकिल्ला परिसरात ऐतिहासिक समाधीची शोध मोहीम अभ्यासकांनी सुरु केली आहे. सध्या सात समाध्या आढळून आल्या असून त्यावर छत्री, कळस, कोरलेले शरभशिल्प कोरलेले आहे. यावरून तालेवार घराण्यातील पराक्रमी सरदारांच्या असतील असा अंदाज असून त्यांची बांधणी १६५० ते १८२० मधील झाली असावी अशी शक्यता अभ्यासक महेश कदम आणि प्रसाद घोडगे यांनी व्यक्त केली आहे.

गेले काही दिवस रत्नागिरीमधील जुन्या समाधीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. श्री. कदम आणि श्री. घोडके यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
कोकणात पश्चिम किनारपट्टीवर वसलेले ऐतिहासिक रत्नागिरी शहर व बंदर. या बंदरातून परदेशात समुद्रमार्गे मोठा व्यापार चालत असे, म्हणून याच्या संरक्षणासाठी रत्नदुर्ग किल्ला उभारण्यात आला. आताच्या मांडवी भागात, तेव्हाचे जकातघर होते. किल्ले रत्नागिरी, पेठ किल्ला, मौजे रहाटाघर, मौजे झाडगाव या चार वस्त्या एकत्र करून रत्नागिरी गावाची निर्मिती झाल्याचे संदर्भ आहेत. या भागाचा इतिहास सुमारे सातशे वर्षे मागे जातो. येथील परिसरात भटकंती करताना ठिकठिकाणी मंदिरे, वाडे, समाध्या, बारव यांच्या रूपाने ऐतिहासिक ठेवा विखुरलेला दृष्टीस पडतो. बहामनी राजवटीच्या कालखंडात साधारणपणे १४७० ते १४७५ दरम्यान बांधलेला व १६७० मध्ये शिवरायांच्या काळात विस्तार झालेला रत्नदुर्ग किल्ला आहे. याचे रत्नागिरी व पेठकिल्ला असे दोन भाग आहेत. किल्ल्यावर लागणाऱ्या सर्व साहित्याचा पुरवठा करणारा भाग म्हणजे पेठ, म्हणून याला पेठकिल्ला असे म्हणतात.
या परिसरात मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक समाध्या आढळून आल्या आहेत. यातील काही किल्ल्यावर, तर काही पेठ किल्ला परिसरात आहेत. सध्या शोध लागलेल्या समाधींची संख्या सात असून, अजूनही काही असण्याची शक्यता आहे. यातील काही समाध्या छत्री, कळस, कोरलेले शरभशिल्प यामुळे सुबक दिसतात. यावरून या समाधी तालेवार घराण्यातील पराक्रमी सरदारांच्या असतील असे अनुमान होते. परंतु या दुर्लक्षित असल्यामुळे सध्या मोडकळीस आल्या आहेत. समाधीच्या बांधणीवरून याचा कालखंड मराठाकालीन म्हणजे १६५० ते १८२० मधील असावा. १५२६ मध्ये आदिलशाहीचे मातब्बर सरदार तुकोजीराव सावंत साळुंखेनी रत्नदुर्ग जिंकून घेतला. तेव्हा या परिसरात मोठे युद्ध होवून त्यांचे बंधू व पुत्र धारातीर्थी पडले. असा उल्लेख इतिहासात असल्याचे श्री. कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, भैरी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने असणाऱ्या वीरगळीमुळे या भागात अनेक लढाया झाल्याचे सिद्ध होते. या समाधींबाबत अभ्यास सुरू असून,लवकरच त्या कोणाच्या आहेत व त्यांचा इतिहास उजेडात आणण्यासाठी शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. यामुळे रत्नागिरी शहराचा ऐतिहासिक समाधींच्या रूपाने असणारा अज्ञात इतिहास समोर येण्याची शक्यता आहे.