रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या रखडलेल्या जिल्हांतर्गत विनंती बदल्यांना येत्या पंधरवड्यात मुहूर्त मिळेल अशी आशा आहे. या बदल्यांवर कोरोनाचे सावट होते. जिल्हाभरातून सुमारे चारशे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या; मात्र विंनती बदल्या तत्काळ कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत. कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने या बदल्यांची प्रक्रियाही गेली महिनाभर थांबलेली होती. प्रशासकीय बदल्या होत नसल्याने मागील वर्षीच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये दुर्गम भागात नियुक्ती मिळालेल्या काही शिक्षकांनी यंदा विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. कोरोनामुळे शैक्षणिक सत्र अजुनही सुरु झालेले नाही. त्यामुळे नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचा सध्या तरी प्रश्न नाही. विनंती बदल्यांची प्रक्रिया त्वरीत व्हावी अशी अनेक शिक्षकांची इच्छा आहे. ती प्रक्रिया महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. यासंदर्भात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. येत्या पंधरा दिवसात त्यावर कार्यवाही होईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.