रत्नागिरी:- तिकीट काढल्यानंतर सुट्या पैशांवरून एसटी बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारा वाद टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने युपीआय पेमेंट प्रणाली सुरू केली आहे. यामुळे गाड्यांमध्ये होणारे वाद तुर्तास टळळे असून, अवघ्या बारा दिवसात युपीआयद्वारे तिकीट काढल्यामुळे रत्नागिरी विभागाला २४ लाख ५६ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटी गाड्यांमध्ये तिकीट काढताना सुट्या पैशांची कायम समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने मोबाइलद्वारे ऑनलाइन व्यवहार करावेत, अशी मागणी प्रवाशांमधून सुरू होती. त्यानुसार महामंडळाने अँड्राइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ईटीआयएम) सर्व आगारांना दोन महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीमुळे प्रवासी युपीआय क्युआर कोडचा वापर करून तिकीट काढू शकतात. त्यामुळे जेवढे तिकीटाचे पैस तेवढेच पैसे देणे सुलभ झाले आहे. या प्रणालीमुळे सुट्या पैशांची भासणारी चणचण दूर झाली आहे.