यावर्षी 11 दिवस रात्री बारापर्यंत जल्लोष साजरा करण्याची मुभा

रत्नागिरी:- या वर्षी 11 दिवस ढिंच्यांग ढिंच्यांगचा आवाज मध्यरात्रीपर्यंत ठेवण्याला परवानगी देण्यात आली असून यामध्ये गणेशोत्सवातील तीन दिवसांसह 31 डिसेंबरचा सरत्या वर्षाचा जल्लोष आणि नववर्षाच्या स्वागत करण्याच्या दिनाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी ध्ननिक्षेपकाच्या तालावर नाचणार्‍यांचा उत्साह 12 वाजेपर्यंत पहायला मिळणार आहे.

या वर्षी गणेशोत्सवातील तीन दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. वर्षभरातील 15 दिवस सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते. यापैकी 11 दिवसांची यादी जाहीर केली असून, त्यात नवरात्रोत्सवातील दोन दिवसांचा समावेश आहे.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने ठराविक दिवशी सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक यांचा वापर करता येतो. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागा वगळून अन्य ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर करता येतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील 15 पैकी 11 दिवसांना ध्ननिक्षेपकाची मुदत वाढविली आहेे. यामध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील तीन दिवस, नवरात्रोत्सवातील दोन दिवस, दिवाळीतील लक्ष्मीपुजनाचा दिवस, ख्रिसमसनिमित्त दि. 24 डिसेंबर, 31 डिसेंबर या दिवसांचा यादीत समावेश आहे. तर आणखी चार दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीला दि. 28 सप्टेंबर रोजी ईद – ए – मिलाद असून त्यासाठी सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवातील दुसरा, पाचवा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे तीन दिवस सूट देण्यात आली आहि तर नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीचा दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.