रत्नागिरी:- शिवसैनिक म्हणून 45 वर्ष आपण पक्षात कार्यरत होतो. उदय बने कधीच उमेदवारीसाठी इच्छूक नव्हता, मात्र संपूर्ण तालुका कार्यकारिणीने शिफारस केल्यामुळेच आपण रिंगणात उतरलो होतो. पक्षप्रमुखांच्या हिशोबात आपल्यात क्षमता कमी दिसली असेल म्हणून उमेदवारी दिली नसेल. यापुढे मी शिवसेना विषय थांबवला असून सामाजिक सेवा सुरु ठेवणार असल्याची स्पष्ट भूमिका उदय बने यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी कुणालाही पाठिंबा देण्याबाबतची घोषणा केली नाही.
उबाठाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की शिवसेना उबाठाच्या सर्व तालुका कार्यकारिणीचे मी आभार मानतो की त्यांनी उमेदवार म्हणून माझी शिफारस केली. त्यामुळे मी तयार झालो होतो असेही त्यांनी सांगितले.
यापुढे मी शिवसेना हा विषय थांबवला असून, यापुढे फक्त समाजसेवा करायची आहे. यापूर्वी जी लोकांची कामे मी करीत आलो आहे तीच कामे यापुढेही चालू ठेवणार आहे. मी शिवसेना उबाठाचा साधा बुथप्रमुखही नाही आहे. फक्त साधा सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझे काम सुरु राहणार असून कुणालाही पाठिंबा देण्याऐवढा आपण मोठा नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उबाठा शिवसेनेच्या रत्नागिरी तालुका कार्यकारिणीचे विशेष आभार मानले.