रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या यात्रास्थळांचा विकास करण्यासाठी 1 कोटी 42 लाख रुपये ग्रामीण यात्रा स्थळ विकास योजनेंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर झाले आहेत. मंजूर झालेल्या कामांपैकी सहा कामांचे प्रस्ताव मागणी करूनही ग्रामपंचायतींनी सादर केलेले नसल्याने प्रशासनाने नियोजन विभागाकडील निधी प्रलंबित ठेवला आहे. आता आचारसंहितेमुळे प्रस्ताव मंजूर होण्यात अडथळे आले असून, हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागातील यात्रास्थळांचा विकास होण्यासाठी त्या-त्या यात्रा स्थळांच्या परिसरातील ग्रामस्थ तसेच लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. यापैकी जिल्ह्यातील प्रस्तावित कामे मंजूर करण्यात आली. या मंजूर कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे अद्याप मंजुरीसाठी आलेले नाहीत. त्यामुळे 1 कोटी 42 लाखांपैकी या कामांसाठी 69 लाख रुपये मंजूर असूनही निधी पडून राहण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतींनी वेळीच कामांचे प्रस्ताव न पाठविल्यास हा निधी अखर्चिक राहून शासन दरबारी पुन्हा जमा होण्याची भीती निर्माण झाली आहे.