यंदा हापूसची करावी लागणार प्रतिक्षा

१५ एप्रिलनंतरच बाजारात दाखल होण्याची शक्यता

रत्नागिरी:- यंदा रत्नागिरीचा प्रसिद्ध हापूस आंबा बाजारात उशिरा येण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्याने, बागायतदारांच्याअंदाजानुसार हापूस आंबा १५ एप्रिलनंतरच बाजारात दाखल होईल.

गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातच हापूस आंबा बाजारात आला होता. मात्र, यंदा चित्र वेगळे आहे. यावर्षी पावसाळा लांबल्याने आंब्याच्या झाडांवर मोठ्या प्रमाणावर पालवी आली. तसेच, पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात जाणवणारी उष्णता देखील जाणवली नाही. परिणामी, डिसेंबरमध्ये थंडी सुरू झाल्यानंतरच मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे एकाच झाडावर एका बाजूला मोहोर आणि एका बाजूला पालवी असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. अनेक झाडांवर केवळ फुलोराच राहिल्याने फळधारणा झालीच नाही.

यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने बागायतदारांची चिंता वाढली आहे. बदलत्या हवामानाचा फटका केवळ हापूस आंब्यालाच नाही तर इतर पिकांनाही बसत आहे.या सर्व परिस्थितीमुळे यंदा ग्राहकांना हापूस आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. १५ एप्रिलनंतरच हापूस आंबा बाजारात येण्याची शक्यता बागायतदारांनी वर्तवली आहे.बदलत्या हवामानाचा परिणाम रत्नागिरीच्या हापूस आंब्यावर झाला असून, यंदा आंबा उशिरा येणार आहे. ग्राहकांना हापूस आंब्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.