यंदा कर्तव्य आहे! हंगामात विवाहासाठी तब्बल ५७ मुहूर्त

रत्नागिरी:- दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह इच्छुक वधूवरांच्या लगीनघाईला सुरुवात होते. अशातच 26 नोव्हेंबरपासून जूनच्या 28 तारखेपर्यंत विवाहासाठी 57 मुहूर्त असल्याने दोनाचे चार हात करण्याची संधी मिळणार आहे.

नोव्हेंबर ते जून या कालावधीत 57 विवाहांचे मुहूर्त आहेत. त्यामुळे आत्तापासूनच अनेकजण मंगल कार्यालय, केटरर्स, डेकोरेशन बुकिंग करत आहेत. सध्या मुला-मुलींची सोयरिक जुळवण्यासाठी पालक व नातेवाईक यांची लगबग सुरू आहे. ज्यांचे विवाह ठरले आहेत ते अलीकडील मुहूर्त ठरवून विवाह सोहळ्याच्या तयारीला गुंतले आहेत. यावर्षीही एप्रिलला गुरूचा अस्त आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये विवाह होणार नाही. यंदा 26 नोव्हेंबरपासून 28 जूनपर्यंत विवाहाचे मुहूर्त आहेत. यंदा मेमध्ये सर्वाधिक 14 तर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक कमी 4 मुहूर्त आहेत. वेगवेगळ्या पंचांगांनुसार लग्न मुहूर्त आहेत. ऐनवेळी मंगल कार्यालय मिळत नसल्याने अनेकजण आगाऊ कार्यालय बूक करण्याच्या तयारीत आहेत. यंदा नोव्हेंबरमध्ये 4, डिसेंबरमध्ये 8, जानेवारीमध्ये 4 फेब्रुवारीमध्ये 11, मार्चमध्ये 5, मेमध्ये 14, जूनमध्ये 12 विवाह मुहूर्त आहेत. 57 विवाह मुहूर्ताखेरीज काही विवाह इच्छुकांचा काढीव लग्न मुहूर्तावरही भर असतो. काही ठिकाणी यजमानांच्या आग्रहाखातर गुरुजी काढीव मुहूर्तही काढून देत आहेत. त्यामुळे आणखी दिवस विवाह सोहळे रंगणार आहेत.

लग्नाचे मुहूर्त
नोव्हेंबर-26, 27, 28, 29, डिसेंबर-2,4,8,9,14, 16, 17, 18, जानेवारी- 18, 26,27,31, फेब्रुवारी-6, 7,10,11,14,16, 22, 23, 24, 27, 28, मार्च – 8, 9,13,17,18, मे -2, 3, 4, 7, 8, 10, 11, 12, 15, 16, 21, 22, 29, 30, जून – 1,3,7,8,11,12,13, 14, 23, 26, 27, 28.