रत्नागिरी:- हमी भाव आणि कर परतावा न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला कोकणातील काजू उत्पादकाला यंदा दरातील घसरणीणे आणखी धक्का दिला आहे. या हंगामात काजू बीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे चालू हंगमात बी साठवणूक करून ठेवलेल्या काजू उत्पादकांची चिंता वाढली आहे. हजारो टन माल अजूनही शेतकर्यांच्या घरात शिल्लक आहे. परंतु अजूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने बागायतदारांमधील अस्वस्थता वाढली आहे.
जिल्ह्यात साठ हजार हेक्टरवर काजू लागवड असून, जवळपास 52 हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. सुरुवातीला प्रतिकिलो 115 रुपये दर होता. त्यामध्ये वाढ होऊन तो प्रतिकिलो 130 ते 135 रुपयांपर्यंत पोहोचला. परंतु सध्या दर कमालीचा घसरला आहे. जिल्ह्यात काजू विक्री वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. कमी झाडे असलेले शेतकरी काजू बी काढल्यानंतर त्याच आठवड्यात त्याची विक्री करतात. मोठे शेतकरी मात्र काजू बी काढल्यानंतर ती साठवून ठेवतात. काजू बीचे दर वाढतील असा बागायतदारांचा अंदाज होता. परंतु एप्रिल अखेरीसदेखील काजू बी दर प्रतिकिलो 100 ते 105 वरच अडखळले आहेत.
शेकडो किलो काजू बी अजूनही बागायतदारांच्या घरात पडून आहेत. त्यांची वेळेत विक्री झाली नाही तर शेतकर्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. चांगला दर मिळत नसताना दुसरीकडे शासन काजू बीला हमी भाव देण्याची तयारी करीत आहे. मात्र ती पुुढच्या हंगामासाठी असणार आहे. त्यामुळे यावर्षी काजू बी ला दर न मिळाल्यास वर्षभर काजू बीच्या बेगमीत गुंतलेला बागायतदार कोलमडणार आहे.
काजू बोंडावर प्रक्रिया करणारे उद्योग येथे नसल्याने काजू बीच्या व्यवसायावरच संपूर्ण हंगामाची मदार असते. हंगामाच्या शेवटी साठवण केलेली सध्याच्या घडीला चार टन काजू बी माझ्या कडे आहे. ती धुवून, वाळवून ठेवली आहे. मात्र अपेक्षित दर नसल्याने त्याची विक्री केलेली नाही. सध्याचा बाजारदरात उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने काजूबी सध्यातरी पडून असल्याचे काजू उत्पादक गौरव शिंदे यांनी सांगितले.