रत्नागिरी:- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत ऑनलाइन अर्जाची मुदत शुक्रवारी संपली. मात्र, अर्ज भरताना पालकांना अनेक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पात्र बालकांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी येत्या 25 मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशासाठी राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर होणार आहे. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. प्रवेशासाठी एक नियमित फेरी राबविली जाईल. त्यानंतर जागा रिक्त राहिल्यास टप्प्याटप्प्याने प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश होतील. पालकांनी एकाच पाल्याचे एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरटीई प्रवेशासाठी निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज, दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबूक आदींसह भाडेतत्त्वावर राहणार्या पालकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे. दरम्यान, पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात 92 शाळांची यामध्ये नोंदणी झाली असून, 929 जागा राखीव आहेत.