रत्नागिरी:- सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारीपासून राज्य शासनाकडून वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई (मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत 25 टक्के मोफत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एक नियमित आणि तीन प्रतीक्षा यादीतील फेर्या पार पडल्या आहेत तरीही जिल्ह्यात 181 जागा रिक्त आहेत.
यंदा राज्यातील 9,086 शाळांमध्ये आरटीईच्या 1,01,906 जागा उपलब्ध असून, त्यासाठी 2 लाख 82 हजार 783 अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीत 1 लाख 12 हजार 560 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत 78 हजार 889 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. तर 23 हजार 17 जागा अद्यापही रिक्त आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात ‘आरटीई’चे 3 हजार 964 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, 963 विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही बाकी आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 94 शाळांमध्ये 914 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यासाठी 1038 जणांना ऑनलाईन नोंदणी केली होती. यातील 671 जणांना प्रवेशाची लॉटरी लागली. यापैकी 490 जणांनी प्रवेश निश्चित केला. आद्यापही 181 जागा रिक्त
आहेत.
प्रतीक्षा यादीतील चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 3 ऑगस्टपर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली होती. या फेरीला पालकांचा अत्यल्प प्रतिसाद होता. त्यानंतर पंधरवडा उलटला तरी ‘आरटीई’च्या वेबसाइटवर या प्रवेशांबाबतची कोणतीही अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रियेबाबत जिल्हा परिषद प्रक्रियेबद्दल शिक्षण विभागातील संबंधित अधिकार्यांनाही कोणतीच माहिती नाही. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी पाचवी फेरी राबविली जाणार की, प्रवेशप्रक्रियाच संपली याबाबत या अधिकार्यांमध्येच संभ्रम आहे.