मोठ्या मासेमारी बंदरांच्या ठिकाणी चोवीस तास देखरेख कक्ष

रत्नागिरी:- ऑगस्टपासून मच्छीमारी हंगाम सुरु झाला असून कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आवश्यक सुचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मोठ्या बंदरांच्या ठिकाणी चोविस तास देखरेख कक्ष स्थापन करावयाचा आहे. कोरोना रुग्ण सापडल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करावे अशा सुचना मत्स्य विभागाने 5 ऑगस्टच्या पत्राद्वारे दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सध्या मासेमारीला सुरवात झाली असून मच्छीमारांनी योग्य त्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार मच्छीमारांसाठीच्या जुन्या निकषात बदल केले आहेत. नवीन सुचनेप्रमाणे मच्छीमार आणि प्रशासन समन्वयासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करुन त्यात मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त, मच्छीमार प्रतिनिधी यांचा समावेश करावा. परवानाधारक मासेमारी नौकांना त्यांच्या परवान्यानुसार निश्‍चित केलेले बंदर, मासळी उतरविण्याचे केंद्रातुनच मासेमारीस जाण्यास व त्याच बंदरात मासेमारी करुन परत येण्यास परवानगी राहील. जेट्टीवर जाणार्‍या प्रत्येक खलाशाची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. ही माहिती जिल्हयाचे सर्व कोविड केअर सेंटर आणि संबंधित यंत्रणांकडे संकलीत करावयाची आहे. एखाद्या बोटींवर आलेला खलाशी कोरोना प्रभावित क्षेत्रातून आला आहे किंवा नाही हे समजेल. बोटीवरील सर्वांच्या तपासण्या करणे व आवश्यकरितीने त्यांचे पृथक करणे याची जबाबदारी जिल्हाप्रशासनाकडे दिली आहे. खलाशांपैकी कोणाला कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्यांना कोविड सेंटरकडे पाठविण्यासाठी कोरोना वाहिनी किंवा ऑन कॉल ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून तो कक्ष चोवीस तास सुरु राहील.

जिल्हा प्रशासनाने स्थानिक मच्छीमार संस्था यांच्याशी विचारविनिमय करुन मासेमारीचा आराखडा तयार करावयाचा आहे. मासेमारी करताना नौकेवरील खलाशाला ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, धाप लागणे, सर्दी, घसा खवखवणे आदी लक्षणे आढळल्यास नौकेचा तांडेल ती माहिती तत्काळ प्रशासनाला देईल. कोविड-19 विषाणूंचा प्रसार टाळण्यासाठी नौका मालक, तांडेल यांनी काळजी घ्यावयाची आहे. नौकेवरील खलाशांना मास्क, सॅनिटायझर, साबण द्यावयाचे आहे. प्रत्येक मासमारी सफरीपूर्वी व नंतर नौका स्वच्छ (सॅनिटाईज) करणे आवश्यक आहे. नौकेत बर्फ भरताना, पाणी घेताना, रेशन (धान्य) भरताना, डिझेल भरताना, मासे उतरविताना सामाजिक अंतराचे व स्वच्छतेचे पालन करावयाचे आहे. क्वारंटाईन कालावधी संपलेल्या लोकांना दोन दिवस बंदरावर मज्जाव असेल. आरोग्य सेतू हे मोबाईल अ‍ॅपचा वापर मच्छीमारांसाठी आवश्यक आहे. देखरेख कक्षाच्या ठिकाणी सर्व खलाशांची थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक राहील. बंदरावर मासळी उतरविण्यासाठी नौकांची गर्दी होणार नाही यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.

सागरी नियमन अधिनियम 1981 मधील तरतुदीनुसार एलईडी मासेमारी, तसेच शासन अधिसूचना 14 जानेवारी 2017 नुसार निश्‍चित केलेला ट्रॉल जाळयाचा खोलाचा आसाचे आकारमान असलेल्या मासेमारी नौकांना मासेमारीसाठी जाण्याची परवानगी देण्यात येवून नये. बेकायदेशीर मासेमारी करणार्‍या नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची जाबाबदारी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जिल्हा कार्यालयाची राहील.