रत्नागिरी:- वाटद एमआयडीसीसाठी एक पोलिस अधिकारी आणि दहा पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कोळीसरे येथे शांततेत मोजणीला सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी या भागात मोजणी करण्यात आली. स्थानिक खातेदारांनी आपली भूमिका मांडत भूसंपादनाबाबत जनसुनावणी घेण्याची मागणी केली. स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंका दूर करूनच भूसंपादन केले जाईल. त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या लोकांना तारखा देऊन जनसुनावणी घेतली जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी ग्रामस्थांना दिले आहे.
वाटद एमआयडीसीसाठी भूमी अभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उपविभागीय अधिकारी यांनी गेल्या आठवड्यात संयुक्त मोजणी केली. ते मोजणीला कळझोंडी येथे गेले होते. परंतु, या मोजणी प्रक्रियेला ग्रामस्थांनी विरोध केला. भूसंपादनासाठी आपण सहकार्य करणार नाही असे स्थानिकांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनीची मोजणी करता आली नाही. परंतु, या परिसरातील एका खासगी कंपनीच्या १५ एकर जमिनीची मोजणी करून अधिकारी माघारी आले होते.
भूमिअभिलेख विभागाकडून १२ फेब्रुवारीला संयुक्त मोजणीसाठीची नोटीस काढली. ती नोटीस कळझोंडीतील जमीनमालक, शेतकरी, ग्रामस्थांकडे वेळेत सुपूर्द करणे आवश्यक होते. मोजणीला आठ दिवस असताना नोटीस वितरण सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक ग्रामस्थ मोजणी प्रक्रियेपासून अनभिज्ञच राहिले.
प्रशासनाकडून या मोजणीविषयी संबंधित ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते, असा आक्षेप स्थानिकांनी घेतला होता, परंतु आज एक पोलिस अधिकारी आणि १० पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन वाटद एमआयडीसीसाठी मोजणी करण्यात आली. मोजणी प्रक्रिया शांततेत झाली असली तरी स्थानिकांना अनेक शंका आहेत. त्याबाबत स्थानिक खातेदार पुढे आले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे याबाबत जनसुनावणी घेऊन पुढील मोजणी करावी, अशी मागणी केली. प्रशासन जनसुनावणीलाही तयार आहे.
एकत्रित मोजणी प्रक्रिया झाल्यानंतर या बाबत दिवस निश्चित करून जनसुणावणी घेतली जाईल. काही बॉर्डरवरील भाग वगळायचा असेल तर त्यावर चर्चा करून निर्णय घेता येईल, असा विश्वास प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्यामुळे मोजणी प्रक्रिया शांततेत झाली. या वेळी कोळीसरे येथील सुमारे ६० एकर जमिनीची मोजणी करण्यात आली.