मोकाट गुरे चंपक मैदानावर आणून ठेवण्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात

मैदानावर शेड, पाणी, लाईट, चार्‍याची व्यवस्था

रत्नागिरी:- गणेश विसर्जन मिरवणुकांपूर्वी शहरातील रस्त्यांवर वावरणारी मोकाट गुरे चंपक मैदानावर आणून ठेवण्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. पकडलेली गुरे ज्याठिकाणी ठेवायची आहेत त्या चंपक मैदानावर शेड, पाणी, लाईट, चार्‍याची व्यवस्था केली जात आहे. रत्नागिरी नगर परिषद, जिल्हा परिषद आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ही कामे केली जात आहेत.

रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारितील चंपक मैदानावरील काही भाग तात्पुरत्या स्वरूपात पकडलेल्या मोकाट गुरांना ठेवण्यासाठी मिळाला आहे. परंतु, काही अतिउत्साही विरोधकांना हे काम तातडीने व्हावेसे वाटत आहे.

रत्नागिरी नगर परिषद मात्र याप्रकरणी गुरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कार्यरत आहे. गुरांचे वारा, पाऊस, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी शेड बांधली जाणार आहे. गुरांना पाणी मिळावे यासाठी नळजोडणी दिली जाणार आहे. आवश्यकता असल्यास टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चार्‍याची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाकडून केली जाणार आहे.

जनावरांची काळजी घेण्यासाठी उद्योजक मुकेश गुंदेचा सहकार्य करणार आहेत. ही सर्व व्यवस्था झाल्यानंतर 21 सप्टेंबरपासून गुरे पकडून ती चंपक मैदानावर नेऊन ठेवली जाणार आहेत. ज्यामुळे गौरी-गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये मोकाट गुरांचा अडथळा होणार नाही.

घोडे, गाढवांकडे दुर्लक्ष
रस्त्यांवरील मोकाट गुरांचा मुद्दा चोहोबाजूने मांडला जात आहे. परंतु, याच रस्त्यांवर फिरणार्‍या मोकाट घोडे आणि गाढवांकडे कोणाचेच लक्ष नाही. घोडे आणि गाढव कसे पकडायचे आणि कुठे ठेवायचे? याबाबत नियोजन नाही.