रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी-खर्डेवाडीतील जंगलात गेलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केल्याने पुन्हा एकदा पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनावरे एकत्र चरत असताना बिबट्याने हल्ला केला. मात्र, बैलाने त्याला प्रतिकार केला असावा. त्यामुळे गाय बचावली आणि बिबट्या पळाला असावा, असा अंदाज गावकऱ्यांनी केला आहे.
दिवाकर खर्डे यांची गाय चरत असताना आज दुपारी बाराला हा हल्ला झाला. माणसांपाठोपाठ पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करण्याचा हा पाचवा प्रकार घडल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण बनले आहे.
मेर्वी खर्डेवाडी येथील दिवाकर खर्डे यांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे जवळच असलेल्या जंगलात चरण्यासाठी सोडली होती. जनावरे चरत असताना ती मध्येच बिथरलेल्या अवस्थेत दिसली. साडेतीन वर्षे वयाच्या गायीच्या पाठीवर ओरखडे आल्याचे लक्षात आल्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात आले.
कळपात असलेल्या बैलाने प्रतिकार केल्याने बिबट्या पळून गेल्याचेही लक्षात आले. गायीवर हल्ला केल्याने पळत असताना तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे ती लंगडत होती. खर्डे यांनी गायीला घरी आणून उपचार केले. तसेच वन विभागाला कळविले. त्यानंतर वन विभागाने घटनेचा पंचनामा केला.
5 सप्टेंबरला चंदुरकर यांच्यावर तसेच तीन दुचाकीस्वारांवर हल्ला केल्यावर वन विभागाने आपली पथके आणून कॅमेरे व पिंजऱ्याच्या माध्यमातून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला अद्यापही यश आलेले नाही.
चौघांवर हल्ला केल्यावर बिबट्याने आपला मोर्चा प्रथम मेर्वी मांडवकरवाडी येथे गायीवर, थोड्या दिवसांनंतर नाखरे येथे दोन ठिकाणी त्यानंतर पावस कुंभारघाटी परिसरात देशमुख यांच्या पाड्यावर दिवसाढवळ्या हल्ला केला. पाड्याला जखमी अवस्थेत घरी आणले. परंतु, गंभीर जखमी असल्याने दुसऱ्या दिवशी तो मरण पावला. त्यानंतर चार-पाच दिवसांनंतर पुन्हा मेर्वी खर्डेवाडी येथील जंगलात गायीवर हल्ला करून बिबट्याने जखमी केले.