रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी वरची म्हादये वाडी येथील महादेव म्हादये यांच्या गाईवर आज रविवारी दुपारी बिबट्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही या भागात दुसरा बिबट्या असल्याचे त्याच दिवशी निष्पन्न झाले होतेच परंतु हा दुसरा बिबट्या जास्तच हिंसक झाल्याचे दिसत असून या चार दिवसात प्राण्यांवरचा त्याचा हा दुसरा हल्ला आहे. या हल्ल्यात गाय जखमी अवस्थेत सापडल्याने परिसरात पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेर्वी गावांमध्ये गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये चार दुचाकीस्वार व एक शेतकरी यांच्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. बिबट्याने चार पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करताना त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. या बिबत्यांपैकी एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये गेल्या गुरुवारीच जेरबंद झाला होता. त्यामुळे आता बिबट्याचे हल्ले थांबतील असे वाटत असतानाच दुसरा बिबट्या मेर्वी परिसरात असल्याचे सिद्ध झाले आणि पुन्हा तिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
अवघ्या दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी येथील वरची म्हादये वाडी येथील महादेव म्हादये यांची गाय जंगलामध्ये चरण्याकरिता सोडली होती. सायंकाळी चारच्या सुमारास समुद्रकिनाऱ्याजवळ जनावरांच्या कळपात गाय जखमी अवस्थेत सापडली. त्यामुळे खळबळ उडाली. तातडीने गाईला उपचाराकरिता घरी आणण्यात आले तेव्हा तिच्या अंगावर बिबट्याने हल्ल्याच्या खुणा दिसून आल्या आणि परिसरात एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.