मेंदूतील रक्तस्त्रावाने कामगाराचा मृत्यू

लांजा:- मोबाईल टॉवर फाउंडेशनचे काम करणाऱ्या कामगाराच्या मेंदूतील रक्तस्त्रावामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील निवसर येथे १३ जानेवारीला घडली आहे.

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेश्वर घोलप हे मोबाईल टॉवर फाउंडेशन तयार करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे बालाजी तात्याराव सूर्यवंशी (वय ४७, रा. गायत्री नगर जि. लातूर, सध्या रा. निवसर) हा व अन्य कामगार कामाला आहेत. सध्या उत्तरेश्वर घोलप यांचे निवसर या ठिकाणी मोबाईल टॉवर फाउंडेशन करण्याचे काम सुरू आहे. १२ जानेवारीला रात्री सर्व कामगारांनी जेवण्यासाठी बाहेर जाण्याचे ठरवले होते; परंतु सूर्यवंशी यांनी नकार दिला.

रात्री उशिरा सर्व कामगार जेवण करून निवसर येथे परत आले. त्यांनी सूर्यवंशी यांना खोलीत झोपण्यासाठी चला, असे सांगितले; मात्र सूर्यवंशी हे खोलीत आले नाहीत म्हणून कामगारांनी बाहेर जाऊन पाहिले त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांनी याची माहिती मालक उत्तरेश्वर घोलप यांना दिली. घोलप यांनी सूर्यवंशी यांना चांदेराई येथील शासकीय दवाखान्यात नेले. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून १३ जानेवारीला पहाटे मृत घोषित केले. शवविच्छेदनामध्ये बालाजी सूर्यवंशी याचा मेंदूतील रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.