मुसळधार पावसाने रत्नागिरी शहर जलमय; अनेक भागात पाणी साचले

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरात मांडवी, मारुतीमंदिर छत्रपती शिवाजी क्रीडांगणामागे असलेल्या भाजीमार्केटजवळ पाणी भरले होते. घुडेवठार येथे गटारे तुंबली आणि पाणी जवळच्या इमारतीत घुसले. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपिट उडात आहे.

शनिवारी (ता. 17) सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली.  मध्यरात्री वेगवान वार्‍यासह पावसाने धुमाकुळच घातला होता. संततधारेमुळे रत्नागिरी शहरातील काही भागांमध्ये पाणी साचुन राहीले होते. घुडेवठार येथील एका मुर्तीशाळेमध्ये साचलेले पाणी शिरले होते. मांडवी परिसरात रस्त्यावर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. पाऊस न थांबल्यामुळे साचलेले पाणी रस्त्याच्या बाजूला असणार्‍या लोकांच्या घरात पाणी शिरु लागले. पालिकेकडून वेळीच गटारे साफसफाई न केल्यामुळे हा परिणाम जाणवत होता. येथील समुद्र किनारी भरतीचे पाणी खेळते रहावे यासाठी बांधलेला पर्‍या गाळाने भरला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी व्यवस्थिती वाहून जात नाही. नैसर्गिक पाणी बाहेर जाण्याची वाट बंद होत असल्याने पाणी साचत आहे. गटारांची योग्य पध्दतीने साफसफाई झालेली नसल्यामुळे गटारे तुंबत आहेत. शहरातील बाजारपेठ परिसरात गोखले नाका येथेही पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
मारुती मंदिर येथील छ. शिवाजी क्रीडांगणामागे नवीन भाजीमार्केटजवळ रस्ता आहे की तळं अशी म्हणायची वेळ आली आहे. दोन फुटापेक्षा अधिक पाणी तेथे सकाळी साचले होते. त्यामधून पादचारी सोडाच दुचाकी चालकही मार्ग काढू शकत नव्हते. चार चाकी चालकांनाही सावधगिरीने पुढे जावे लागत आहे. याच ठिकाणी मोठे खड्डे असल्यामुळे त्याचाही फटका वाहनचालकांना बसत आहे.

पहिल्या पावसात मच्छीमार्केट परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे तेथील नागरिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे ठिकाण ठिकाणी या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. पाऊस आणि नळपाणी योजनेसाठी केलेल्या खोदाईमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी त्यामध्ये साचून राहिल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी चालक या खड्डत पडल्याचे प्रकारही घडत आहेत. याकडे पालिकेकडून गांभिर्याने लक्ष दिले पाहीज अशी मागणी नागरिकांकडून केली आहेत.